(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तांदळाच्या दरात विक्रमी वाढ, गेल्या 15 वर्षांतील उच्चांकी दर; सरकार चिंतेत
तांदळाच्या दरात सातत्यानं वाढ (Rice Price Hike) होत आहे. सध्या तांदळाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळं तांदळाच्या किंमतीने मागील 15 वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
Rice Price Hike: तांदळाच्या दरात सातत्यानं वाढ (Rice Price Hike) होत आहे. सध्या तांदळाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळं तांदळाच्या किंमतीने मागील 15 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं तांदळाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. आशियाई आणि आफ्रिकन खंडातील देशांमध्ये, तांदूळ हे लोकांच्या ताटातील मुख्य अन्न आहे. मात्र, तांदळाच्या महागाईनं आधीच लोकांच्या अडचणी वाढवल्या असून, आगामी काळात तांदूळ आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तांदळाचे भाव 15 वर्षांच्या उच्चांकावर
भारतानं तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळं भारतानं तांदळावर घातलेली निर्यातबंदी आणि थायलंडमध्ये भात पिकाचे झालेले नुकसान हे तांदळाच्या किंमती वाढण्याचे मुख्य कारण आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये किंमतीत नरमाई दिसून आली होती. परंतू नोव्हेंबरपासून किमतींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. एल निनोमुळं आशिया खंडातील भात पिकांना मोठा फटका बसला आहे.
तांदळाच्या वाढत्या किंमतीमुळं भारत सरकार चिंतेत
भारतातही तांदळाच्या किंमती वाढल्यानं सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर नुकतेच सरकारनं तांदूळ कारखान्यांना तांदळाच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत तांदळाचे दर वाढल्याने सरकारही चिंतेत आहे.
एका वर्षात तांदूळ 15 टक्क्यांनी महागला
ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात तांदळाच्या किंमतीत सुमारे 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. या आकडेवारीनुसार, 21 डिसेंबर 2022 रोजी तांदळाची किरकोळ किंमत 37.99 रुपये प्रति किलो होती. जी 20 डिसेंबर 2023 रोजी वाढून 43.51 रुपये प्रति किलो झाली.
तांदूळ कंपन्यांना दर कमी करण्याचे आदेश
18 डिसेंबर 2023 रोजी, ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि पुरवठा विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी तांदूळ प्रक्रिया उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. गैर-बासमती तांदळाच्या किमतींचा आढावा घेतला. या बैठकीत सचिवांनी या प्रतिनिधींना देशांतर्गत बाजारपेठेतील तांदळाचे भाव तातडीने कमी करण्याचे आदेश दिले आहेत. नफेखोरी टाळण्याचा सल्ला दिला. गेल्या दोन वर्षांत तांदळाच्या दरात वार्षिक 12 टक्के वाढ झाल्याबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली.
तांदळाचं उत्पादन घटण्याची शक्यता
दरम्यान, या खरीप हंगामात भारतातील तांदूळ उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या 8 वर्षांत प्रथमच तांदूळ उत्पादनात घट होऊ शकते. भारत हा तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यावर्षी जुलै 2023 मध्ये सरकारनं देशांतर्गत बाजारातील किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
महत्त्वाच्या बातम्या: