तांदळाच्या दरात 500 रुपयांची घसरण! FCI कडून इथेनॉलसाठी तांदळाची मोठ्या प्रमाणावर खरेदी
Rice Price : केंद्राने FCI कडून डिस्टिलरींना विकल्या जाणाऱ्या तांदळाच्या किमतीत प्रति क्विंटल 550 रुपयांची कपात केली आहे.
Rice Price : केंद्र सरकारने नवीन वर्ष 2025-26 साठी इथेनॉल मिश्रणाचे 20 टक्के लक्ष्य ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी तांदूळ, मका तसेच इतर भरड धान्यांचा वापर केला जात आहे. तर, उसापासून देखील इथेनॉल तयार केले जात आहे. आता इथेनॉलचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेत केंद्राने FCI कडून डिस्टिलरींना विकल्या जाणाऱ्या तांदळाच्या किमतीत प्रति क्विंटल 550 रुपयांची कपात केली आहे. डिस्टिलरीज कमी किमतीत 24 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करू शकतील. या निर्णयानंतर इथेनॉल निर्मितीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
डिस्टिलरीज 12 लाख टन तांदूळ खरेदी करू शकतील
अन्न मंत्रालयाने 2024-25 या कालावधीत FCI तांदूळ सुमारे 110 कोटी लिटर इथेनॉलसाठी वापरावे असे आदेश दिले आहेत. यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि इथेनॉल उत्पादकांसाठी खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (OMSS) एफसीआय तांदळाची राखीव किंमत 550 रुपये प्रति क्विंटलने कमी करून 2250 रुपये केली. अन्न मंत्रालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारे आणि सरकारी कंपन्या 12 लाख टनांपर्यंत खरेदी करू शकतात, तर इथेनॉल डिस्टिलरींना 24 लाख टनांपर्यंत कमी दराने खरेदी करण्याची परवानगी आहे.
यापूर्वी तांदळाची राखीव किंमत 2800 रुपये
राज्ये आणि डिस्टिलरीजसाठी एफसीआयची पूर्वीची राखीव किंमत 2800 रुपये प्रति क्विंटल होती. यामध्ये प्रतिक्विंटल 550 रुपयांनी भावात कपात करण्यात आली असून, त्यानंतर आता तांदूळ 2250 रुपयांनी मिळू शकेल. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI), साप्ताहिक ई-लिलावाद्वारे तांदूळ साठा व्यवस्थापित करणारी संस्था, हे सुधारित धोरण 30 जून 2025 पर्यंत लागू करेल.
खासगी व्यापाऱ्यांच्या किमतीत बदल नाही
केंद्राच्या निर्णयानुसार, खासगी व्यापारी आणि सहकारी संस्था प्रति क्विंटल 2800 रुपयाने तांदळाची विक्री करतील. तर NAFED, NCCF आणि केंद्रीय भांडार सारख्या केंद्रीय सहकारी संस्थांनी 'भारत' ब्रँड अंतर्गत विक्री केल्यास 2400 रुपये प्रति क्विंटल द्यावे लागतील. OMSS धोरणाचे उद्दिष्ट अन्न सुरक्षा वाढवणे आणि विविध भागधारकांना तांदळाचे कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणे हे आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्यावर भर
इथेनॉल पुरवठा वर्ष (नोव्हेंबर-ऑक्टोबर) 2025-26 साठी 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, देशाला 2023-24 मध्ये 1,000 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करावे लागेल, जे 545 कोटी लिटर होते. एका अधिकृत नोंदीनुसार, 2023-24 मध्ये ESY दरम्यान पेट्रोलशी 14.6 टक्के मिश्रण साध्य झाले आहे. गुळापासून इथेनॉल बनवण्याची क्षमता 941कोटी लिटर आणि धान्यावर आधारित डिस्टिलरीजची क्षमता ७४४ कोटी लिटर इथेनॉल असल्याचे सांगण्यात आले.