(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, किरकोळ महागाई दर घसरला
सणासुदीच्या पूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे.
Retail Inflation Data : सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. या सणासुदीच्या पूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे. किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर घसरल्याची माहिती समोर आली आहे. महागाई दर 6 टक्क्यांच्या वर गेला होता. त्यामध्ये आता घसरण झाली आहे.
खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाल्यामुळं, सप्टेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर घसरला आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर हा 6.83 टक्के होता. यापूर्वी जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर आता 5.02 टक्क्यांवर आला आहे. ही दिलासादायक बाब आहे. आरबीआयने हा महागाई दर चार टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अन्न महागाई दरात घट
सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अन्नधान्याच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे. अन्नधान्य महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 6.56 टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होता. मात्र, तरीही ग्रामीण भागातील जनतेला महागाईने हैराण केले आहे. ग्रामीण भागात किरकोळ चलनवाढीचा दर 5.33 टक्के आहे, तर अन्नधान्य चलनवाढीचा दर 6.65 टक्के आहे.
खाद्यपदार्थांच्या किमती झाल्या कमी
सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं भाज्यांचा महागाई दर ऑगस्टमध्ये 26.14 टक्के होता, तो 3.39 टक्क्यांवर आला आहे. मात्र, डाळींच्या भाववाढीचे प्रमाण वाढले आहे. डाळींच्या महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 16.38 टक्के झाला आहे. जो ऑगस्टमध्ये 13.04 टक्के होता. मसाल्यांच्या महागाई दरात किंचित घट झाली आहे. ऑगस्टमध्ये 23.19 टक्के होता तो 23.06 टक्के आहे. दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दरही कमी झाला आहे. तो ऑगस्टमध्ये 7.73 टक्के होता तो 6.89 टक्क्यांवर आला आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दरही खाली आला असून सप्टेंबरमध्ये तो 10.95 टक्के होता, जो ऑगस्टमध्ये 11.85 टक्के होता.
दरम्यान, महागाईचा दर कमी झाल्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कारण सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात खाद्यपदार्थांचे दर कमी झाल्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला लागणारी कात्री कमी होणार आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर हा 6.83 टक्के होता. यापूर्वी जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांच्या वर होता.
महत्त्वाच्या बातम्या: