Home Loan : घर खरेदी करणं झालं सोपं, आरबीआयनं रेपो रेट घटवताच देशातील 'या' चार बँकांनी व्याज दर घटवले, EMI घटणार
Home Loan : आरबीआयनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात गेल्यानंतर ग्राहकांना देखील त्याचा फायदा होत आहे. आरबीआयच्या घोषणेनंतर बँका व्याज दरात कपात करत आहेत.

नवी दिल्ली : जर तुम्ही घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीनं सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवला आहे. पतधोरण विषयक समितीनं शुक्रवारी म्हणजेच 6 जूनला रेपो रेट 0.50 टक्क्यांनी घटवला आहे. आता रेपो रेट 5.5 टक्के आहे. रेपो रेटमध्ये फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत 1 टक्क्यानं कमी झाला आहे.
या निर्णयाचा थेट फायदा गृह कर्ज घेणाऱ्यांना मिळणार आहे. काही बँकांनी व्याज दरात कपात केली आहे. यामुळं तुमचा ईएमआय कमी होईल. विशेष म्हणजे याचा फायदा नव्या कर्जदारांनाच नाही तर आता ज्यांचं कर्ज सुरु आहे त्यांना देखील होईल. त्यासाठी व्याजदराचा प्रकार रेपो रेट आधारित असला पाहिजे.
बँक ऑफ बडोदानं देखील आरबीआयच्या रेपो रेट कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं रेपो लिंक्ड लेडिंग रेट मध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात करुन तो 8.15 टक्के केला आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार गृहकर्जाच्या व्याजदराची सुरुवात 8 टक्क्यांपासून होते.
गृहकर्जाचा ईएमआय कमी होणार
पंजाब नॅशनल बँकेनं देखील त्यांच्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेनं त्यांच्या आरलएलएलआरचा दर 8.85 टक्क्यांवरुन कमी करुन 8.35 टक्के केला आहे. हा दर 9 जूनपासून लागू होईल. पंजाब नॅशनल बँकेनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यात म्हटलंय, ग्राहकांसाठी खूशखबर, तुमचा ईएमआय आणखी स्वस्त. बँकेच्या माहितीनुसार गृहकर्जाचा व्याज दर 7.45 टक्क्यांपासून सुरु होत आहे. वाहन कर्जाचा व्याज दर 7.80 टक्के इतका आहे.
बँक ऑफ इंडियानं देखील व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आता बँकेच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 8.35 टक्के इतका आहे. यामुळं बँकेच्या ग्राहकांना ईएमआय कमी भरावा लागेल.
यूको बँकेनं देखील ग्राहकांना दिलासा देत यावेळी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिग रेट कमी केला आहे. या दरात 10 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. हा दर 10 जूनपासून लागू होईल. होगी.
ईएमआय कमी होणार, बचत वाढणार
आरबीआयनं सलग तीन वेळा रेपो रेट कमी केल्यानं त्याचा फायदा बँकेच्या कर्जदारांना होणार आहे. ज्या ग्राहकांचं कर्ज रेपो रेटशी संबंधित आहे. त्यांचा ईएमआय कमी झाला आहे. म्हणजेच त्यांची बचत वाढेल, घर खरेदी करणं स्वस्त झालं आहे.


















