Reliance Industries AGM : कॉर्पोरेट जगतामधील मोठा इव्हेंट; IPO ते 5 जी इंटरनेट..मुकेश अंबानी उद्या मोठी घोषणा करणार?
Reliance Industries AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा, सोमवारी 28 ऑगस्ट रोजी होणार असून मुकेश अंबानी महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (Reliance Industries AGM) तारीख जवळ आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि बाजार विश्लेषकांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी असल्याने प्रत्येकजण तिच्या सर्वसाधारण बैठकीची अनेकांना प्रतिक्षा असते. मात्र, गेल्या काही वर्षांत या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले आहे, प्रत्येक वेळी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अशा मोठ्या घोषणा केल्या जात आहेत.
रिलायन्सची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance Industries 46th AGM)
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजची सर्वसाधारण सभा सोमवारी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीवरील सर्वात महत्त्वाची असणाऱ्या कंपनीची ही 46 वी वार्षिक सभा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत आगामी वर्षभरातील व्यवसाय, उद्योग धोरणाची माहिती दिली जाते. तेलापासून दूरसंचार आणि रिटेलपासून ते आर्थिक क्षेत्रातही आपले साम्राज्य निर्माण केलेल्या कंपनीकडून आगामी वाटचालीची घोषणा केली जाते.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या घोषणेवर लक्ष
यंदाच्या सर्वसाधारण सभेत आयपीओबाबत मोठ्या घोषणा होऊ शकतात. अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांचे वित्तीय सेवा युनिट डिमर्ज केले आहे. त्याचे आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड असे नामकरण करण्यात आले आहे. रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात जसा प्रभाव पाडला आहे तसाच ही कंपनी वित्त क्षेत्रातही प्रभाव पाडू शकेल असा बाजाराचा अंदाज आहे. त्यामुळेच या बैठकीत Jio Financial Services Limited बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी, नवीन ऑफर्स याबाबतची घोषणा होऊ शकते.
तीन आयपीओ बाजारात येण्याची शक्यता?
Jio Financial Services चे रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जिंग केल्यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज ते बाजारात स्वतंत्र स्वरूपात आणू शकते. आगामी काळात Jio Financial Services Limited चा IPO येणार आहे की नाही, याबाबतही घोषणा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओचा आणि रिटेलच्या आयपीओबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्वस्त 5G फोनबाबत घोषणा?
रिलायन्स जिओ परवडणारा 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्सचा स्वस्त 5G फोन किती स्वस्त असेल, हे या बैठकीत स्पष्ट होईल. त्याशिवाय, रिलायन्स जिओच्या 5G टॅरिफ प्लॅनबाबत काही घोषणा देखील शक्य आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये स्वस्त 5G योजना देखील सादर केल्या जातील अशी अपेक्षा आहे.
मुकेश अंबानींचा वारस ठरणार?
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. मागील काही वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी आपल्या व्यवसायाची जबाबादारी आपल्या मुलांकडे सोपवली आहे. टप्प्याटप्प्याने ही जबाबदारी पुढील पिढीकडे सोपवली जात आहे. त्यातून मुकेश अंबानी यांची दोन्ही मुले अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्समधील काही व्यवसायाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता आगामी सर्वसाधारण सभेत वारस कोण असणार, याबाबत काही संकेत मुकेश अंबानी देणार का, याकडे गुंतवणूकदार, बाजार विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.