RBI Monetary Policy: रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर; व्याजदरात कोणताही बदल नाही
RBI Monetary Policy Update: रिझर्व्ह बँकने आपले पतधोरण जाहीर केले असून व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
RBI Monetary Policy Update: रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले असून अपेक्षेनुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका करण्यात आला आहे. सलग 11 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, भू-राजकीय संघर्षाचा परिणाम अनेक अर्थव्यवस्थांवर होत आहे. भारतासाठीदेखील हा आव्हानात्मक काळ आहे. देशात महागाई दर वाढण्याचाही अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मान्सून सरासरी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारातील घडामोडी पाहून धोरणात बदल करण्यात येईल असेही दास यांनी सांगितले.
महागाई दर वाढणार
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, देशात महागाई दर वाढीचा अंदाज आहे. रिेटेल महागाई दर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5.7 टक्के असण्याची शक्यता आहे. तर, एप्रिल-जून 2022 दरम्यान किरकोळ महागाई दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याशिवाय, जुलै-सप्टेंबरमधील तिमाहीत किरकोळ महागाई दर 5.3 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. तर, ऑक्टोबर-डिसेंबरसाठी किरकोळ महागाई दर हा 5.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
GDP चा दर घटणार
आर्थिक वर्ष 2023 मध्ये जीडीपीचा अंदाज 7.8 टक्क्यांहून 7.2 टक्के इतका करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2023 मधील चौथ्या तिमाहीत जीडीपीचा दर 4 टक्क्यांवर ठेवण्यात आला आहे. शेअर बाजारात अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.