Rakesh Jhunjhunwala Investment Tips : 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे गुंतवणुकीचे पाच धडे तुम्हालाही ठरतील फायदेशीर!
Rakesh Jhunjhunwala Death Anniversary : भारताचे 'बिग बुल' अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांचे गुंतवणुकीचे काही धडे फायदेशीर ठरू शकतात.
Rakesh Jhunjhunwala: भारतीय शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवास हा एखाद्या दंतकथेप्रमाणे भासावा असा राहिला आहे. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून शेअर बाजारातील प्रवासाला सुरुवात करणाऱ्या झुनझुनवाला यांनी अब्जावधींचे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदार हे राकेश झुनझुनवाला यांना आपले आदर्श मानतात.
राकेश झुनझुनवाला यांनी ट्रेडिंगपेक्षा गुंतवणुकीवर अधिक भर दिला. त्यांनी सुरुवातीच्या काळात ट्रेडिंग केली असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीतून त्यांनी संपत्ती निर्माण केली.
झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीच्या शैलीचे पाच ठळक मुद्दे :
> संयम: झुनझुनवाला यांच्या यशामागे संयम हा घटक महत्त्वाचा होता. बाजारात कितीही गोंधळ, अस्थिर वातावरण असले तरी झुनझुनवाला हे शांत, संयमी भूमिका घेत असे. एखादी गुंतवणूक करण्याआधी योग्य वेळ घ्यावा, योग्य संशोधन असावे. घाईत घेतलेल्या निर्णयामुळे नेहमीच मोठे नुकसान होते. कोणत्याही स्टॉकमध्ये पैसे ठेवण्यापूर्वी स्वतःचा वेळ घ्या," झुनझुनवाला म्हणाले होते.
> दीर्घकालीन संधी शोधा : झुनझुनवाला हे संधी शोधण्यात प्रवीण होते आणि गुंतवणुकीत संयम आणि दीर्घकालीन दृष्टीकोन या महत्त्वावर त्यांचा विश्वास होता. उदाहरणार्थ, टायटन कंपनीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी या स्टॉकमधील दीर्घकालीन क्षमता ओळखली. त्यांचा हा अंदाज इतका अचूक राहिला, की
त्यांच्यासाठी हा स्टॉक सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारा ठरला.
> चुकांमधून शिका : झुनझुनवाला हे चुकांमधून सातत्याने शिकत होते आणि चुका करण्यासही घाबरत नव्हते. मात्र, त्यांनी कधीही मर्यादा ओलांडली नाही. त्यांनी एकदा म्हटले की, मला चुका करण्याची भीती वाटत नाही. पण माझ्या चुका त्या होत्या ज्या मला परवडत होत्या. ते खूप महत्वाचे आहे. चुका होतील पण तुम्ही त्या तुम्हाला परवडतील अशा मर्यादेत ठेवल्या पाहिजेत."
> बाजाराचा अंदाज वर्तवू नका : बाजारात कधीही अंदाज, भविष्य वर्तवू नका, असे झुनझुनवाला म्हणत असे. "बाजाराची प्रतिक्रिया कशी असेल हे तुम्ही कधीही सांगू शकत नाही. तुम्ही त्याचे मॉडेल बनवू शकता. तुम्ही त्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु हवामान आणि बाजार आणि जोखीम, फक्त देव जाणतो कारण फक्त त्यानेच उद्याचा दिवस पाहिला असतो, असेही झुनझुनवाला यांनी म्हटले.
> स्टॉकचे मूल्यांकन महत्त्वाचे : एखाद्याने स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन समजून घेतले पाहिजे. सोयीस्कर मुल्यांकनाने खरेदी केलेला शेअर वधारण्याची लक्षणीय शक्यता असते. कधीही अवास्तव मूल्यांकनावर गुंतवणूक करू नका. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या कंपन्यांसाठी कधीही धावू नका, असेही झुनझुनवाला यांनी म्हटले होते.
(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागार, गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)