Income Tax Refund: एक कोटींहून अधिक लोकांच्या खात्यात पैसे आले, तुम्हाला मिळाले का? असे तपासा, कधी मिळणार
Income Tax Refund: मागील काही दिवसांतच आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांना रिफंडदेखील मिळाला आहे.
Income Tax Refund: आयकर रिटर्न (Income Tax Return) दाखल करण्यासाठी आता काही मोजकेच दिवस राहिले आहेत. त्यामुळे करदात्यांकडून आयकर विवरण भरण्यासाठी (Income Tax Return File) मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू झाली आहे. मागील काही दिवसांतच आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांना रिफंडदेखील मिळाला आहे.
>> एका आठवड्यात इतके दाखल आयकर रिटर्न
प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, पोर्टलवर आतापर्यंत 11.31 कोटी वैयक्तिक करदात्यांची नोंदणी झाली आहे. सध्याच्या मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी, आतापर्यंत 2.61 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. सुमारे एक आठवड्यापूर्वी त्यांची संख्या सुमारे 1.30 कोटी होती. अशाप्रकारे, एका आठवड्यात 1.25 कोटीहून अधिक रिटर्न भरले गेले आहेत.
>> रिटर्नची पडताळणी करणे आवश्यक आहे
आकडेवारीनुसार, यापैकी सुमारे 2.41 कोटी आयकर परताव्याची पडताळणीही झाली आहे. केवळ आयकर रिटर्न भरून काम पूर्ण होत नाही, तर त्याची पडताळणी करणेही आवश्यक आहे. पडताळणीनंतरच विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण मानली जाते. त्यानंतर प्राप्तिकर विभाग रिटर्नवर प्रक्रिया करतो आणि सर्व माहिती योग्य आढळल्यास, करदात्याने दावा केलेला परतावा करदात्याच्या खात्यात जमा केला जातो.
>> जलद प्रक्रिया
प्राप्तिकर विभागाने सुमारे आठवडाभरापूर्वी प्राप्तिकर परताव्याची प्रक्रिया सुरू केली. आता आयकर रिटर्नच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत सुमारे 1.13 कोटी व्हेरिफाइड आयकर रिटर्न प्रोसेस केली आहे. यापैकी बहुतांश रिफंडचे पैसे पात्र करदात्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
>> करदात्यांना मिळतोय रिफंड
जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न देखील भरले असेल तर तुम्ही त्याची स्थिती कधीही तपासू शकता. रिटर्न भरल्यानंतर लगेचच त्याची पडताळणी केली जाते. आता या कामासाठी विभागाला एक आठवडा लागत आहे. रिफंडचे पैसे देखील करदात्याला रिटर्नची प्रक्रिया केल्यानंतर 1-2 दिवसात प्राप्त होतात.
>> रिफंड स्टेट्स कसे तपासावे
- सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
- Quick Links पर्याय निवडा.
- ड्रॉपडाऊन मेनूमध्ये तुम्हाला Know Your Refund Status दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता पॅन नंबर, मूल्यांकन वर्ष आणि मोबाईल नंबर यासारखे तपशील भरा.
- तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते भरा. यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल.