Nitin Gadkari: रस्तेनिर्मितीसाठी पुरेसा निधी, युपी आणि बिहारमधील रस्ते अमेरिकेसारखे करणार: नितीन गडकरी
Nitin Gadkari: देशात रस्तेनिर्मितीसाठी पुरेसा निधी असून उत्तर प्रदेश, बिहारमधील रस्ते हे अमेरिकेसारखे असतील असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.
Nitin Gadkari: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्तेनिर्मितीसाठी पुरेसा निधी असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न असल्याचे सांगत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रस्तेदेखील अमेरिकेप्रमाणे करणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
नॅशनल हायवेज् इन्फ्रा ट्रस्ट आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. गडकरी यांनी सांगितले की, InvIT चा आमचा पहिला प्रयोग होता. आम्हाला जी रक्कम उभी करायची होती त्यापेक्षा सात पटीनं अधिक रक्कम उभी करण्यात यश आल्याने मला आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढा प्रतिसाद हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची विश्वासार्हता दर्शवत असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. मुंबई शेअर बाजाराशी (Bombay Stock Exchange) माझे जुने नाते असल्याचे त्यांनी यावेळी सांगत जुनी आठवण सांगितली. युती सरकारच्या काळात 1997 मध्ये मी मंत्री असताना इथं आलो होतो. त्यावेळी एमएसआरडीसीसाठी पैसे उभे करायचे होते. तेव्हा रक्कम अधिक मिळाली नाही. मात्र, विश्वासार्हता मिळवल्यानंतर अधिक पैसे बॉण्डच्या माध्यमातून उभे होत गेले. सरकारमधून बॉण्डच्या माध्यमातून पैसे उभे करणं अनेकांना कठीण वाटतं, मात्र यात चांगला परतावा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी पायाभूत सुविधा आवश्यक
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करणे हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आमच्याकडे सध्या प्रकल्पांची कमतरता नाही. नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. एक लाख कोटी खर्च करून आम्ही हा प्रकल्प 70 टक्के पूर्ण केला आहे. त्याशिवाय, आम्ही अनेक ग्रीन कॉरिडोअर तयार करत असून 15500 इलेक्ट्रीक बसेस घेत आहोत. त्यामुळे प्रति किलोमीटर लागणारा खर्च खूप कमी आहे. भारतीय तंत्रज्ञान वापरून लेह-लडाखमध्ये रोप-रेल्वे तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी बीपीटीजवळ आम्ही वॉटर टॅक्सी-वे उभा करत आहोत, अशी माहितीदेखील गडकरी यांनी दिली.
सरकार लवकरच रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. गुंतवणूकदारांना मासिक आधारावर परतावा घेता येईल असेही गडकरी यांनी म्हटले.