(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Rules from 1st October : 1 ऑक्टोबरपासून 'या' नियमात होणार बदल...तुमच्या खिशावरही होणार परिणाम...जाणून घ्या नवे नियम
New Rules from 1st October : 1 ऑक्टोबर 2023 पासूनही नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा परिणाम तुमच्या खिशांवर होणार आहे.
मु्ंबई : प्रत्येक महिन्याची एक तारीख खास असते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन नियम लागू होतात. बदल होणारे हे नवे नियम सामान्यांच्या खिशावर परिणाम करतात. 1 ऑक्टोबर 2023 पासूनही नवीन नियम लागू होणार आहेत. सीएनजी-पीएनजी, एलपीजी गॅसच्या (LPG CNG Price) दरात बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, आता 1 ऑक्टोबरपासून वाहन परवाना, शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखला प्रमाणपत्र (Birth Certificate) अनिवार्य असणार आहे. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
> एलपीजी-पीएनजी, सीएनजी गॅसच्या दरात बदल
1 ऑक्टोबरपासून एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या एक तारखेला गॅसच्या दरात बदल केला जातो.
> मुंबईच्या वेशीवरील टोल दरात वाढ
मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाचही नाक्यांवरील टोल दरामध्ये (Mumbai Toll Price Hike) वाढ करण्यात येणार आहे. मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो. कारसाठी पाच रुपये तर मिनीबस 10 रुपये, ट्रक आणि बससाठी 20 रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत.
> बचत योजनांना आधार लिंक करणे आवश्यक
अल्प बचत योजनेच्या विद्यमान ग्राहकांना आपली खाती आधारशी लिंक करावी लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा पोस्ट ऑफिस प्लॅन यासारख्या लहान बचत योजना सुरू ठेवण्यासाठी आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे. अन्यथा 1 ऑक्टोबरपासून तुमचे खाते गोठवले जाईल.
> जन्म प्रमाणपत्र आवश्यक
आता जन्म प्रमाणपत्र हे अनेक गोष्टी सिद्ध करण्यासाठी एकच कागदपत्र असणार आहे. आता नवीन नियमांनुसार जन्म-मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 हा 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहे. या नियमानुसार जन्म-मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. गृह मंत्रालयाने 13 सप्टेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी केली होती. शाळांमध्ये प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना जारी करणे, मतदार यादी तयार करणे, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पासपोर्ट जारी करणे आणि आधार क्रमांक यासह विविध प्रक्रियेसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असणार आहे.
> 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर जाणार
1 ऑक्टोबरपासून चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर जाणार आहेत. रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यात आँणखी सात दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.
> TCS नियम
नवीन TCS नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहेत. आता तुम्ही परदेशात तुमच्या क्रेडिट कार्डवर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास तुम्हाला त्यावर 20 टक्के TCS भरावा लागेल. मात्र, हा खर्च वैद्यकीय किंवा शिक्षणावर असेल तर त्यावर 5 टक्के टीसीएस आकारला जाईल. तुम्ही परदेशात शिक्षणासाठी कर्ज घेतल्यास, 7 लाख रुपयांपेक्षा जास्त मर्यादेवर TCS 0.5 टक्के दराने आकारले जाईल.