(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवाळीपूर्वीच अनेकांच्या घरी फुटणार फटाके! मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत; घर मिळाली की नाही हे नेमकं कुठं समजणार?
म्हाडाने मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी सोडत प्रक्रिया रावली होती. या सोडतीचा आज निकाल जाहीर केला जणार आहे. या सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
Mumbai MHADA Lottery 2024 : म्हाडातर्फे मुंबई मंडळासाठी एकूण 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आली. गेल्या साधारण दोन महिन्यांपासून ही प्रक्रिया राबवली जात होती. आता हीच सोडत आज जाहीर केली जाणार आहे. म्हणजेच एकूण 1 लाख 13 हजार अर्जदारांपैकी भाग्यवंत 2030 जणांचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आज (8 ऑक्टोबर) सकाळी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10.30 वाजता सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
कोणकोणत्या ठिकाणी घरं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अतुल सावे हे उपस्थित राहणार आहेत. म्हाडाच्या 2030 घरांसाठी एकूण 1 लाख 13 हजार 542 जणांनी अर्ज केलेला आहे. या सोडतीमध्ये गोरेगाव, मालाड, जुहू, दादार, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवाई यासह अन्य ठिकाणच्या घरांचा समावेश आहे.
1 लाखांच्या वर अर्ज
मुंबईतील या 2030 घरांसाठी म्हाडाने 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2024 या काळात सोडत प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर या सोडतीसाठी एकूण 1 लाख 13 हजार 811 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केला होता. मात्र यापैकी 269 अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे बाद झाले होते. त्यामुळे आता 1 लाख 13 हजार 242 अर्ज शर्यतीत आहेत.
लाईव्ह कार्यक्रम कुठे पाहता येणार
अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर पाहता येईल.
घर मिळालं की नाही हे नेमकं कधी समजणार?
वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचनापत्र पाठविले जाणार आहे. त्यानंतर सूचनापत्रातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र पाठविले जाणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! सिडकोची घरे विकण्यासाठी आता परवानगीची गरज नाही, शुल्कही केलं माफ