रिलायन्स इंडस्ट्रीज बनली देशातील नंबर वन कंपनी, TCS, HDFC ला टाकलं मागे
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) दृष्टीनं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा देशातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.
Most Valued Company: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) दृष्टीनं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा देशातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) मागे टाकले आहे. हुरुन ग्लोबल 500 लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस सॉफ्टवेअर (एआय सॉफ्टवेअर) चॅट जीपीटीच्या आधारे, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीडियासारख्या कंपन्यांनी मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. मात्र, या यादीत कोणत्याही भारतीय कंपनीला टॉप 40 मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. हुरुन ग्लोबल 500 ची यादी बुधवारी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जगातील 500 अशासकीय कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे वर्चस्व कायम आहे. 198 अब्ज डॉलर मार्केट कॅपच्या बाबतीत कंपनी 44 व्या स्थानावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजही गेल्या वर्षी देशातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली. या वर्षी कंपनीच्या निव्वळ संपत्तीत 2 टक्क्यांनी घट झाली असून ती 10 स्थानांनी घसरली आहे.
TCS 5 तर HDFC बँक 43 स्थानांनी वधारली
हुरुनच्या अहवालानुसार, TCS 60 व्या आणि HDFC बँक 68 व्या स्थानावर आहे. TCS ची निव्वळ संपत्ती 14 टक्क्यांनी वाढून 158 अब्ज डॉलर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात 5 स्थानांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळं, कंपनीला 43 स्थानांचा फायदा झाला आहे. ती यादीत 68 व्या स्थानावर राहिली. टायटन कंपनी आणि सन फार्मास्युटिकल यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
अदानी समूहाचे मोठे नुकसान
यावर्षी 48 कंपन्याही या यादीतून बाहेर पडल्या आहेत. यामध्ये भारतातील अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे. एकूणच या यादीत भारत एका स्थानाने खाली घसरला असून सहाव्या क्रमांकावर आला आहे. देशातील 18 कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. जर संपूर्ण जगाचा समावेश केला तर प्रथमच अशा 5 कंपन्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे, ज्याचे बाजार मूल्य 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. यामध्ये Apple, Microsoft, Alphabet, Amazon आणि Nvidia यांचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजार मूल्य 708 अब्ज डॉलर आणि Nvidia चे 697 अब्ज डॉलर आहे. Nvidia च्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. हा चॅट जीपीटीचा प्रभाव असल्याचे मानले जाते. चॅट जीपीटीचे मालक OpenAI देखील या यादीत प्रथमच 50 अब्ज डॉलर बाजार मूल्यासह 291 व्या क्रमांकावर आले आहेत. तैवानची TSMC वगळता, टॉप 10 मधील सर्व कंपन्या अमेरिकन आहेत.