Mhada Lottery : सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या पुणे अन् कोकण मंडळाचा धमाका, विधानसभेपूर्वीच 18920 घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरु
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण आणि पुणे मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून (Mhada Lottery 2024) 2030 घरांच्या सोडतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पुणे आणि कोकण मंडळांकडून घरांच्या विक्रीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पुणे मंडळाकडून 6294 घरांच्या तर कोकण मंडळाकडून 12626 घरांच्या विक्रीसाठी दोन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, वसई विरार, रायगड आणि सिंधुदुर्ग भागातील घरांच्या विक्रीसाठी योजना जाहीर केल्या आहेत. कोकण मंडळाच्या एकूण घरांपैकी 1187 घरं ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील आहेत तर 1439 घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील घरांच्या विक्रीसाठी सोडत पुणे मंडळाकडून काढण्यात आली आहे.
पुणे मंडळाकडून 6294 घरांची विक्री
पुणे मंडळाची सोडत देखील पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 418 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3312 सदनिकांचा समावेश आहे तसेच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 131 सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे.
पुणे मंडळातील घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत. तर, 5 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे.
कोकण मंडळाकडून एकूण 12226 घरांची विक्री
कोकण मंडळानं ठाणे, कल्याण, वसई विरार, रायगड इत्यादी ठिकाणच्या घरांच्या विक्रीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रतम प्राधान्य आणि सदनिका विक्री सोडत योजना याद्वारे घरांची विक्री केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री याद्वारे 11187 घरांची सदनिका विक्री सोडत योजनेद्वारे 1439 घरांची विक्री करण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री योजना याद्वारे 11187 घरांची विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, एकात्मिक गृहनिर्माण योजना, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, कोकण मंडळ प्रकल्पातील विखुरलेल्या सदनिका यातील घरांची विक्री केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना 9883 घरांची विक्री केली जाणार आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजना 512 घरं, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना 661 आणि कोकण मंडळ प्रकल्पातील विखुरलेल्या सदनिकांची संख्या 131 विक्री करण्यात येणार आहे.
सदनिका विक्री सोडत योजनेद्वारे 1439 घरांची विक्री केली जाणार आहे. या योजनेत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, कोकण मंडळ अंतर्गत सदनिका, कोकण मंडळ अंतर्गत भूखंड, पत्रकारांसाठी आरक्षित सदनिकांचा समावेश आहे. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 594 घरं, कोकण मंडळ अंतर्गत सदनिका 607, कोकण मंडळ अंतर्गत भूखंड 117, पत्रकारांसाठी आरक्षित सदनिका 121 घरांची विक्री केली जाणार आहे.
इतर बातम्या :