LIC : केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
LIC : केंद्र सरकार त्यांच्याकडे असणाऱ्या एलआयसीमधील भागीदारीपैकी काही टक्के शेअर्सची विक्री करणार आहे.या संदर्भात अपडेट मिळताच एलआयसीचे शेअर घटले.

LIC Disinvestment नवी दिल्ली : केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या योजनेवर काम करत आहेत. केंद्र सरकारकडे एलआयसीमध्ये 96.5 टक्के भागीदारी आहे. त्यापैकी 6.5 टक्के भागीदारी केंद्र सरकार विकण्याची शक्यता आहे. या संदर्भात अपडेट येताच एलआयसीच्या स्टॉकमध्ये 19 रुपयांची घसरण झाली आहे. एलआयसीचा स्टॉक 926. 90 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
एलआयसीनं मे 2022 मध्ये आयपीओ आणला होता. त्यावेळी 902-949 रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. केंद्र सरकारनं त्यावेळी एलआयसीमधील 3.5 टक्के भागीदारी विकली होती. त्यावेळी केंद्र सरकारला 21000 कोटी रुपये मिळाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारनं ऑफर फॉर सेलच्या मार्गानं एलआयसीमधील शेअर विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. बाजारातील स्थिती पाहून आणि भागीदारी विक्री संदर्भातील निर्णय निर्गुंतवणूक विभागावर अवलंबून असेल. भागीदारी विक्रीची टक्केवारी, किंमत आणि वेळ येत्या काळात होईल, असं सूत्रांनी म्हटलं. केंद्र सरकारला 16 मे 2027 पर्यंत एलआयसीमध्ये सार्वजनिक भागीदारी 10 टक्के असणं आवश्यक आहे. केंद्राला तोपर्यंत एलआयसीमधील 6.5 टक्के भागीदारी विकावी लागणार आहे. एलआयसीचं बाजारमूल्य 5. 85 लाख कोटी रुपये आहे. एलआयसीचा शेअर 946 रुपयांवरुन 19 रुपयांनी घसरुन 926 रुपयांवर आला आहे.
दरम्यान, भारतीय जीवन विमा निगमच्या वैयक्तिक प्रिमियम सेग्मेंट मधील उत्पन्न 14.60 टक्क्यांनी वाढलं आहे. खासगी क्षेत्रातील सर्व जीवन विमा कंपन्यांच्या एकूण प्रिमियम उत्पन्नात 12.12 टक्क्यांची वाढ झाली आहे. एलआयसीनं जून 2025 मध्ये वैयक्तिक प्रिमियम 5313 कोटी रुपयांपर्यंत जमवला आहे. खासगी क्षेत्रातील 25 कंपन्यांनी एकूण 8408 कोटी रुपये जमवले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























