LIC Share Price : एलआयसीच्या गुंतवणुकदारांना मोठा फटका; शेअर दरात मोठी घसरण
LIC Share Price : एलआयसीच्या लिस्टिंगपासून सुरू असलेली घसरण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. एलआयसीच्या शेअरने आज 52 आठवड्यातील सर्वात कमी किंमत नोंदवली.
LIC Share Price : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर दरात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. आयपीओ दरापासून आतापर्यंत एलआयसीचा शेअर दर 10 टक्क्यांनी घसरला आहे. आज शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा फटका शेअर बाजारालादेखील बसला आहे. एलआयसीच्या शेअर दराने आज 843 रुपये इतका आतापर्यंतचा कमी दर गाठला.
एलआयसीने आपल्या शेअर दराची किंमत 949 रुपये प्रति शेअर इतकी ठेवली होती. एलआयसीच्या आयपीओला देशातील गुंतवणुकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर, परदेशी गुंतवणुकदारांनी पाठ फिरवली होती.
आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात महागाईच्या भीतीने मोठी घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. या घसरणीमध्ये एलआयसीच्या शेअरमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेल्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला काही गुंतवणूक सल्लागारांनी दिला आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून संभाव्य व्यवसाय आणि एलआयसीची बाजारातील पत पाहता दीर्घकाळ गुंतवणूक ठेवणे फायद्याचे ठरू शकते असे अँजल वनचे मुख्य सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.
मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसच्या हेमांग जानी यांनी म्हटले की, एलआयसीची लिस्टिंग कमी किंमतीत झाली. मात्र, आकर्षक मूल्यांकन आणि बाजारातील स्थिरता लक्षात घेता किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणुकदार एलआयसीकडे वळू शकतात असे त्यांनी म्हटले.
Macquarie या परदेशी ब्रोकरेज फर्मने एलआयसीला टार्गेट प्राइस 1000 रुपये सांगितले आहे. त्याशिवाय न्यूट्रल रेटिंगही दिली आहे. Macquarie चे टार्गेट प्राइसिंग इश्यू किंमतीपेक्षा 5.37 टक्के अधिक आहे.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. )