JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी रिटेल गुंतवणूकदारांना 21 ऑक्टोबरपासून खुला होणार आहे.

मुंबई : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा 30213 कोटी रुपयांचा आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान उपलब्ध असेल. जीईपीएल कॅपिटल, वेंचुरा सिक्युरिटीज, एसएमसी ग्लोबल या संस्थांच्या ब्रोकरेज रिपोर्टनुसार 2 जी यूजर्सचं अपग्रेडेशन, होम ब्रॉडबँड आणि एआय, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान विक्री या क्षेत्रात वाढीच्या संधी आहेत. जिओकडे 30 जून 2026 नुसार 533.3 दशलक्ष ग्राहक आहेत. जिओचा प्रयत्न पारंपरिक मोबाईल कनेक्टिव्हिटीचा विस्तार करणे आणि उत्पन्नाचे विविध पर्याय निर्माण करण्याचा आहे.
ग्रोथ इंजिन 1 : 2 जी यूजर्सचं अपग्रेडेशन
जीईपीएल कॅपिटलच्या अंदाजानुसार 30 जून 2026 च्या आकडेवारीनुसार 261 दशलक्ष यूजर्स अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहेत. या ग्राहकांना 4G किंवा 5G सेवांकडे आकर्षित करण्याची जिओकडे संधी आहे. जीईपीएल कॅपिटल रिपोर्टनुसार 799 रुपयांच्या जिओ भारत फोन आणि डिजीटल सेवांच्या एकत्रिकरणाद्वारे वाजवी किमतीत ग्राहक वाढवण्याची संधी आहे.
जिओला प्रति ग्राहक मिळणारं उत्पन्न 2024 मध्ये 181.7 रुपये होतं ते 2027 पर्यंत 215.6 रुपयांवर पोहोचलं आहे. कंपनी प्रीमिअम प्लॅन्स, टॅरिफमधील बदल आणि डिजीटल सेवा देत उत्पन्नात वाढ करु शकते.
ग्रोथ इंजिन 2 : होम ब्रॉडबॅण्ड
जिओकडे जून 2026 पर्यंत जिओफायबर आणि जिओएअर फायबर ग्राहकांची संख्या 28.6 दशलक्ष होती. त्यापैकी,14 दशलक्ष जिओ एअरफायबर कनेक्शनचे ग्राहक होते.
जीईपीएल कॅपिटलच्या रिपोर्टनुसार : "होम ब्रॉडबँड हा व्यवसाय वाढीचा आणखी एक घटक आहे. जिओफायबर व जिओ एअरफायबर आर्थिक वर्ष 2026 मधील भारताच्या सुमारे 21 टक्के फिक्स्ड ब्रॉडबँड वापराचा फायदा घेऊ शकतात. 2031 पर्यंत ते 46 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं.
एसएमसी ग्लोबलने, ज्या भागांमध्ये फायबर टाकणे अवघड किंवा खर्चिक आहे, तिथे कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याची जिओ एअरफायबरची क्षमता अधोरेखित केली आहे.
ग्रोथ इंजिन 3 : एआय तंत्रज्ञान
जिओ आपल्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणि एंटरप्राइझ सेवांमधूनही कमाई करण्याचा विचार करत आहे. व्हेंटुरा सिक्युरिटीजच्या रिपोर्टनुसार, "जिओने एक एंड-टू-एंड मालकीचा 5G स्टँडअलोन स्टॅक विकसित केला आहे. 4G, 5G, 6G, AI व डिजिटल तंत्रज्ञानामध्ये 7,220 पेटंट अर्ज दाखल केले आहेत. त्याच्या मालकीचा AI प्लॅटफॉर्म, जिओब्रेन, नेटवर्क ऑपरेशन्समध्ये वापर केला जात आहे आणि तो जिओच्या व्यापक तंत्रज्ञान कमाई धोरणाचा एक भाग आहे."
एसएमसी ग्लोबलच्या रिपोर्टनुसार दूरसंचार, क्लाउड कंप्युटिंग आणि एआय यांच्या एकत्रीकरणामुळे कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे संधी जिओसाठी निर्माण होऊ शकतात.
ग्रोथ इंजिन 4 : आंतरराष्ट्रीय विस्तार अजेंड्यावर
जिओ आंतरराष्ट्रीय ऑपरेटर्स आणि व्यवसायांना स्वतःचे दूरसंचार आणि एआय तंत्रज्ञान देण्याचं नियोजन करत आहे. जीईपीएल कॅपिटलच्या रिपोर्टनुसार, या भागीदारींमुळे जिओकडे देशांतर्गत कनेक्टिव्हिटी सेवांच्या पलीकडे महसूल निर्माण होऊ शकतो.
एसएमसी ग्लोबलने नमूद केले की, या दृष्टिकोनामुळे जिओला "आपल्या संपूर्ण देशांतर्गत पायाभूत सुविधांची पुनरावृत्ती न करता भारताबाहेर विस्तार करण्यास" मदत होऊ शकते.
ब्रोकरेज कंपन्यांनी ज्या विकासाच्या संधी मांडल्या आहेत त्या भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या व्यापक विस्ताराशी निगडित आहेत. वाढता डेटा वापर, 5G चा विस्तार आणि वाढती ब्रॉडबँड उपलब्धता यामुळे कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवांच्या मागणीवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
जीईपीएल कॅपिटलच्या अंदाजानुसार, भारताचा मोबाईल ब्रॉडबँड एआरपीयू (ARPU) आर्थिक वर्ष 2026 मधील 199.5 कोटींवरून 2031 पर्यंत 326.4 कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
जीईपीएल कॅपिटलने त्यांच्या मूल्यांकनाचा निष्कर्ष काढताना म्हटलं की: " जिओच्या रणनीतीनुसार ग्राहक वाढीला चालना देणे, प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढवणे, डिजिटल सेवांचा विस्तार वाढवणे आणि एंटरप्राइझ आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान सेवांच्या माध्यमातून महसुलात विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित केलं जातंय, ज्यामुळे शाश्वत महसूल वाढ आणि दीर्घकालीन नफ्यास मदत होऊ शकते."
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)






















