Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरची 'या' कंपनीत आहे गुंतवणूक; आता लाँच होणार आयपीओ
Azad Engineering IPO : दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असणाऱ्या कंपनीचा आयपीओ आता खुला होणार आहे.
IPO News : दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) गुंतवणूक (Investment) असणाऱ्या कंपनीत तुम्हालाही गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. तेलंगणातील आझाद इंजिनिअरिंग कंपनीचा आयपीओ (Azad Engineering IPO) या आठवड्यात खुला होणार आहे. 20 डिसेंबर रोजी आयपीओ खुला (IPO News) होणार आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या वर्षी मे महिन्यात या कंपनीत गुंतवणूक केली होती.
आझाद इंजिनिअरिंग कंपनी ही एक टर्बाइन आणि एरोस्पेस पार्ट्स उत्पादक कंपनी आहे. कंपनीची उत्पादने एरोस्पेस आणि संरक्षण, ऊर्जा, तेल आणि वायू उद्योगांना पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीमध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल इंक., मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड, सीमेन्स एनर्जी, ईटन एरोस्पेस आणि MAN एनर्जी सोल्युशन्स एसई आदी कंपन्यांचा समावेश आहे. IPO मध्ये प्रति शेअर किंमत 499 रुपये ते 524 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
आझाद इंजिनिअरिंग कंपनीचा IPO हा 20 डिसेंबर रोजी खुला होणार असून आणि 22 डिसेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. अँकर गुंतवणूकदार 19 डिसेंबरला बोली लावू शकतात. IPO मध्ये 740 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि प्रवर्तक OFS द्वारे शेअर्स विकतील. कंपनीच्या पब्लिक इश्यूमध्ये 240 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच, OFS अंतर्गत, प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदारांचे 500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकले जातील.
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव
आझाद इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO मध्ये, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 50 टक्के राखीव असणार आहे. तर, हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्तींसाठी 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदार किमान 28 शेअर्सच्या लॉटमध्ये बोली लावू शकतात. कंपनी नवीन शेअर्सद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर भांडवली खर्चासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करणार आहे.
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक
मास्टर ब्लास्टरने मे 2023 मध्येच आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, सचिनने कंपनीत किती गुंतवणूक केली याची माहिती त्याने अथवा कंपनीकडून देण्यात आली नाही. कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आझाद इंजिनिअरिंगचा महसूल 2022-23 या आर्थिक वर्षात 251.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात ते 124 कोटी रुपये होते. जून 2023 पर्यंत आझाद इंजिनिअरिंगवर157.41 कोटी रुपयांचे कर्ज होते.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)