IPO : पुढच्या आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात; सुमारे 4,500 कोटी जमा करण्याची योजना
गेल्या वर्षी 63 आयपीओच्या माध्यमातून 1.19 लाख कोटी रुपये उभे करण्यात आले होते. आता चार नवीन आयपीओ शेअर बाजारात येत आहेत.
मुंबई: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात चार कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. या कंपन्यांमध्ये ग्लोबल हेल्थ, DCX सिस्टम्स आणि बिकाजी फूड्स इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या आयपीओबद्दल आणि कंपनीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या चार कंपन्या एकत्रितपणे आयपीओमधून 4,500 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारू शकतात अशी माहिती मर्चंट बँकिंग सूत्रांनी दिली आहे. युनिपार्ट्स इंडिया आणि फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सचा आयपीओही नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो अशी देखील माहिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक नामी संधी चालून आली आहे.
या कंपन्यांमध्ये कधीपर्यंत गुंतवणुकीची संधी ?
DCX चा आयपीओ 31 ऑक्टोबरला उघडेल आणि 2 नोव्हेंबरला बंद होईल. तर फ्युजन मायक्रो फायनान्सचा आयपीओ 2 नोव्हेंबरला उघडेल आणि 4 नोव्हेंबरला बंद होईल. ग्लोबल हेल्थ आणि बिकाजी फूड्सचा आयपीओ 3 नोव्हेंबरला उघडेल आणि 7 नोव्हेंबरला बंद होईल. या वर्षात म्हणजे 2022 मध्ये आतापर्यंत 22 कंपन्यांनी त्यांचे आयपीओ बाजारात आणले आहेत. या कंपन्यांनी आत्तापर्यंत शेअर्सच्या विक्रीतून 44,000 कोटी रुपये उभे केले आहेत.
DCX सिस्टम IPO
DCX Systems च्या आयपीओ अंतर्गत 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत NCBG होल्डिंग्स इंक आणि VNG टेक्नॉलॉजीच्या प्रवर्तकांकडून 100 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील. बंगळुरू स्थित कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून आधीच 225 कोटी रुपये उभे केले आहेत. आयपीओसाठी किंमत बँड 197-207 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.
फ्युजन मायक्रो फायनान्स
फ्यूजन मायक्रो फायनान्सचा आयपीओद्वारे 1,104 कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. या अंतर्गत कंपनी 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. तसेच, 1,36,95,466 इक्विटी समभागांची विक्री ऑफर फॉर सेल (OFS ) अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे केली जाईल. कंपनीने आयपीओसाठी 350-368 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे.
ग्लोबल हेल्थ
ग्लोबल हेल्थच्या आयपीओ अंतर्गत 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, कंपनी OFS अंतर्गत 5.08 कोटी शेअर्स विकणार आहे. आयपीओ साठी किंमत 319-336 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. कंपनीला आयपीओ मधून 2,206 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे.
बिकाजी फूड्स इंटरनॅशनल
बिकाजी फूड्स इंटरनॅशनल आयपीओमधून 1,000 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजीचा मानस आहे. याशिवाय कंपनीचे प्रवर्तक ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 2.94 कोटी शेअर्स विकतील. चारही कंपन्यांचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.
आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद
यामुळे गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये 63 आयपीओच्या माध्यमातून 1.19 लाख कोटी रुपये उभे करण्यात आले. दुय्यम बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ बाजार या वर्षी आतापर्यंत कमकुवत राहिला आहे. परंतु असे असूनही, आयपीओला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. कारण गुंतवणूकदारांना आकर्षक किमतीत नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे.