LG IPO : पैसे तयार ठेवा, एलजीचा 15 हजार कोटींचा आयपीओ येणार, जाणून आयपीओ कधी लाँच होणार?
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्सचा 15 हजार कोटींचा आयपीओ लवकरच येणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनी 15 टक्के भागीदारी कमी करण्यासाठी 10.2 कोटी शेअर विकणार आहे.

LG Electronics IPO मुंबई : तुम्ही जर आयपीओद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ लवकरच लाँच होणार आहे. कंपनी आयपीओद्वारे 15000 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स 10.2 कोटी शेअर म्हणजेच 15 टक्के भागीदारी विकणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनी त्यांच्या भारतातील यूनिटमधील भागीदारी 15 टक्क्यांन कमी करण्याबाबत विचार करत आहे. हा 2025 मधील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.
आयपीओ लाँच कधी होणार?
मीडिया रिपोर्टनुसार एलजीचा आयपीओ ऑक्टोबर 2025 मध्ये येऊ शकतो. कंपनीनं यापूर्वी आयपीओ लाँच करणं लांबणीवर टाकलं होतं. कंपनी शेअर बाजारातील स्थिती सुधारण्याची वाट पाहत होती. एलजी इलेक्ट्रॉनिक्स ऑक्टोबर महिना ही योग्य वेळ समजून आयपीओ लाँच करण्याचा विचार करत आहे. कंपनीनं डिसेंबर 2024 मध्ये डीआरएपी दाखल केला होता. सेबीनं त्याला मंजुरी दिली होती.
एलजीनं एप्रिल ते मे महिन्यात आयपीओ लाँच करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र, टॅरिफसंदर्भात निर्माण झालेला तणाव, बाजारातील तेजी आणि घसरण, कमी मूल्यांकन यामुळं त्यावेळी आयपीओ लाँच केला नव्हता. डीआरएचपीनुसार मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, एक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया, सिटीग्रुप ग्लोबल मार्केटस इंडिया हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. केफिन टेक्नोलॉजीज इश्यू रजिस्ट्रार आहे.
ऑक्टोबरमध्ये आयपीओ लाँच करुन कंपनी देशातील प्रायमरी मार्केटमध्ये असणाऱ्या तेजीचा फायदा उठवू शकते. 2025मध्ये 30 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून 60000 कोटी रुपये कमावले होते. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसनं 12500 कोटी रुपयांची उभारणी केली. येत्या काळात 70 हजार कोटी रुपयांचे आयपीओ येऊ शकतात. टाटा कॅपिटल 17200 कोटी, ग्रो, मीशो, फोनपे, बोट, वीवर्क इंडिया, लेन्सकार्ट, शॅडोफॅक्स आणि फिजिक्सवाला या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























