Post Office Investment : पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेचा दुहेरी फायदा; कर बचत आणि चांगल्या परताव्याची हमी
Post Office Investment : पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो. या योजनेतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा आणि कर सवलत मिळते.
Post Office Investment : कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारपेठेतील जोखीम कायम आहे. शेअर बाजारात कमालीची घसरण होत आहे. अशा परिस्थितीत, सध्या अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर बहुतांश मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. मात्र तरीही लोकांना चांगला परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक योजना ठरू शकते.
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत (Post Office Term Deposit Scheme) ग्राहकांना चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही या योजनेत एक, दोन, तीन आणि 5 वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. या सर्व कार्यकाळात तुम्हाला चांगल्या व्याजदरासह परतावा दिले जातो.
पोस्ट ऑफिसच्या Post Office Term Deposit Scheme तुम्हाला एक ते तीन वर्षासाठीच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज दर मिळतो. तर, पाच वर्षापर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 6.7 टक्के व्याजदर मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. मात्र, 10 वर्षावरील मुलांच्या नावे खाते सुरू करता येऊ शकते. हे खाते पालकांच्या संमतीने आणि देखरेखीत सुरू करता येईल. तुम्ही या योजनेत किमान एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह हे खाते सुरू करू शकता. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
कर बचतीचा फायदा
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर खात्याच्या (Income Tax Rebate) 80C नुसार कर सवलत मिळू शकते. या गुंतवणूक योजनेनुसार तुम्हाला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. त्याशिवाय तुम्ही एकहून अधिक टर्म डिपॉझिट अकाउंट सुरू करू शकता. या योजनेत तुम्ही खाते सुरू केल्यानंतर किमान सहा महिने पैसे काढू शकत नाही. त्यानंतर एक वर्षाच्या आत तुम्ही मुदत ठेवीतील गुंतवणूक काढून घेतल्यास एकूण जमा रक्कमेपैकी दोन टक्के रक्कम कापली जाते.
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या पाच वर्षांच्या योजनेत पाच लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के या व्याजदराने परतावा मिळतो. हा परतावा तिमाहीच्या आधारे गुंतवणुकीत आणखी जोडला जातो. त्यानंतर तुम्हाला पाच लाखांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षानंतर जवळपास सात लाख रुपये मिळतील.