(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Insurance : 7 वर्षांपूर्वी अपघातात पाय गमावला; दोन कोटींची नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेश
Insurance Claim : मुंबईतील भांडुप येथे राहणारे 53 वर्षीय पीडित व्यक्ती हे एका एफएमसीजी कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर (डीजीएम) होते. सात वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना पाय गमवावा लागला होता.
मुंबई : रस्ता अपघातात उजवा पाय गमावलेल्या व्यक्तीला 2 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. मोटार अपघात दावा न्यायाधिकरण (MACT) ने 7 वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर 2016 मध्ये झालेल्या या अपघातावर निर्णय दिला. विहित मुदतीत नुकसान भरपाई न दिल्यास व्याजासह रक्कम भरावी लागणार आहे. विमा कंपनीला (Insurance Claim) आदेश देण्यात आले आहेत.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरने होते चिरडले
मुंबईतील भांडुप येथे राहणारे 53 वर्षीय पीडित व्यक्ती हे एका एफएमसीजी कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर (डीजीएम) होते. त्यांची पोस्टिंग मध्य प्रदेशात होती. ते एका मित्रासोबत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरहून दतियाला कारने जात होते. शौचालयात जाण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ कार थांबवली होती. मूत्रविसर्जन करत असताना दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले. या अपघातानंतर त्यांचा पाय कापावा लागला.
लवादाने म्हटले की, कंपनीने पीडित व्यक्तीला या अपघातानंतर आलेल्या अपंगात्वामुळे कामावरून काढले नाही हे सुदैव आहे. निकाल देताना न्यायाधिकरणाने सांगितले की, अपघातामुळे अपीलकर्त्याच्या कमाईचे नुकसान झाले नाही हे खरे आहे. त्याची नोकरी सुरूच होती. पण, कंपनीने त्याला कामावरून काढले नाही हे त्याचे नशीब. मात्र, या अपघातामुळे त्याच्या कमाई क्षमतेवर निश्चितच परिणाम झाला. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या नोकरीचे स्वरूप आणि त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात ठेवाव्या लागतात. आम्ही असे मानू शकत नाही की त्यांच्या कमाई क्षमतेवर परिणाम झाला नाही. त्याना पाय गमवावा लागल्याने ही अपघात पीडित व्यक्ती आता पूर्वीप्रमाणे कष्ट करू शकत नाही, ही बाब लवादाने अधोरेखित केली.
कुटुंबाला मिळणार एक लाख रुपये
न्यायाधिकरणाने पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला त्यांच्या सेवेसाठी एक लाख रुपये देण्याचे निर्देशही दिले. ते म्हणाले की, अपघात पीडित व्यक्तीला आता सतत कोणाच्या तरी मदतीची गरज असते. त्याला नीट चालताही येत नाही. याशिवाय उपचारावरही सातत्याने खर्च होत आहे. पीडित व्यक्तीने वाहन मालक राकेश शर्मा आणि विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्सविरुद्ध खटला दाखल केला होता. विमा कंपनी नुकसान भरपाई देईल.