Narayan Murthy : नारायण मूर्ती आजही आठवड्यातून 70 तास काम करतात; ते कॉर्पोरेट गांधी, पण मी कस्तुरबा नाही; नेमक्या काय म्हणाल्या सुधा मूर्ती?
Narayan Murthy : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आजही 70 तासांपेक्षा जास्त काम करतात, यावर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण मूर्ती कॉर्पोरेट गांधी असले तरी मी कस्तुरबा नाही, असं सुधा मुर्ती म्हणाल्या.
Narayan Murthy : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांचं एक वक्तव्य मध्यंतरी चांगलंच चर्चेत आलं होतं. तरुणांनी आठवड्यातून किमान 70 तास काम करावं, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला पत्नी सुधा मूर्ती यांनी देखील पाठिंबा दिला आहे. आजही मी 70 तासांपेक्षा जास्त काम करते, असं सुधा मूर्तींनी म्हटलं.
इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी एका मुलाखतीत नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना त्यांच्यातील नात्याबद्दल आणि एकमेकांप्रती असलेल्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना सुधा मूर्तींनी म्हटलं की, "हे कॉर्पोरेटचे गांधी आहेत, पण मी कस्तुरबा नाही. 1974 मध्ये प्रथम भेट झाल्यापासून ते आतापर्यंत मी यांना मूर्ती म्हणूनच हाक मारते."
मीपण 70 तासांपेक्षा जास्त वेळ काम करते : सुधा मूर्ती
लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांचे पती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याबाबतच्या विधानाचं समर्थन केलं. सुधा मूर्ती म्हणाल्या, "या वयातही मी आठवड्यातून 70 तास काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे, त्याबद्दल आवड निर्माण केली पाहिजे आणि सुट्टीच्या दिवसातही काम केलं पाहिजे, क्वॉलिटी टाईम हा अधिक महत्त्वाचा असतो"
क्वॉलिटी टाईम महत्त्वाचा : नारायण मूर्ती
दरम्यान, नारायण मूर्ती म्हणाले की, कंपनी स्थिर करताना त्यांनी आठवड्यातून 85 ते 90 तास काम केलं. हे इतकं करुनही त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला. स्पेंड केलेल्या टाईमपेक्षा क्वॉलिटी टाईम घालवणं अधिक महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
नारायण मूर्तींनी मांडलं वेळेचं गणित
स्वत:चं अनुभव सांगताना नारायण मूर्ती म्हणाले, "मी सकाळी 6 वाजता ऑफिसला जायचो आणि रात्री 9.15 च्या सुमारास घरी परतायचो. घरी पोहोचेपर्यंत मुलं गेटवर वाट बघत असायची. घरी येताच सुधा, मुलं आणि माझे सासरे गाडीत बसायचे आणि आम्हाला आवडेल ते पदार्थ खायला आम्ही जायचो आणि त्या काळात आम्ही खूप मजा करायचो. जेव्हा जेव्हा कुटुंबात कोणतीही अडचण येते तेव्हा मी नेहमी त्यांच्यासाठी वेळ काढायचो."
तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं : नारायण मूर्ती
काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. या विधानाने देशभरात चर्चेला उधाण आलं होतं. यावर अनेक अब्जाधीशांनी प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. काहींनी मूर्ती यांच्या विधानाचं समर्थन केलं, तर काहींनी त्यांना विरोधही दर्शवला होता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: