India GDP: भारताच्या आर्थिक विकास दराचे आकडे आज जाहीर होणार; चौथ्या तिमाहीत जीडीपीत घट होण्याचा अंदाज
India GDP : भारताच्या आर्थिक विकासाच्या दराचे आकडे आज जाहीर होणार आहे. त्याशिवाय चौथ्या तिमाहीती आकडेवारी समोर येणार असून तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत विकास दरवाढीत घसरण होण्याचा अंदाज आहे.
India GDP Growth Data : आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीचे आकडे आज जाहीर होणार आहेत. या तिमाहीत भारताचा विकास दर 3.5 टक्के राहिला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर, 2021-22 मध्ये जीडीपीचा दर 8 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकास दर 5.4 टक्के इतका राहिला होता. तर, पहिल्या तिमाहीत विकास दर 20.1 टक्के आणि दुसऱ्या तिमाहीत 8.4 टक्के इतका राहिला.
जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान कोरोना महासाथ, रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध याच्या परिणामी कमोडिटीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यामुळे विकास दर कमी राहण्याचा अंदाज आहे.
याआधी रेटिंग संस्था असलेल्या Moody's ने 2022-23 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वाढलेल्या महागाईच्या परिणामी 2022 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात 30 बेसिस पॉईंटची घट होऊन 9.1 टक्क्यांहून 8.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 5.4 टक्के राहण्याचा अंदाज Moody'sने व्यक्त केला.
2022 मध्ये GDP वाढीचा दर 8.8 टक्के राहण्याचा अंदाज
मूडीजने आपल्या ग्लोबल मॅक्रो रिपोर्ट आउटलुक अहवालात म्हटले आहे की, कच्चे तेल, अन्न आणि खतांच्या किमती वाढल्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीपासून ते त्यांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग संस्थेने देखील जीडीपीचा दर घटणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
वाढती महागाई, दीर्घकाळ चालत असलेले रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम भारताच्या अर्थचक्रावर होत असल्याचे एस अॅण्ड पी ग्लोबल रेटिंग संस्थेने म्हटले आहे.
महागाईचा दर अधिक काळ राहणे ही चितेंची बाब आहे असल्याचे 'एस अॅण्ड पी' संस्थेने म्हटले. भारताच्या मध्यवर्ती बँकेने सध्या असलेल्या दरापेक्षाही अधिक दर वाढवण्याची आवश्यकता असल्याचे संस्थेने अहवालात म्हटले. मात्र, यामुळे उत्पादन आणि रोजगाराला फटका बसण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
महागाई दर वाढण्याचा अंदाज
S&P Global Ratings आर्थिक वर्ष 2022-23 साठी किरकोळ महागाई दर 6.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेने हा किरकोळ महागाई दर 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनेदेखील भारताचा अंदाजित विकास दर हा 9 टक्क्यांवरून 8.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आशियाई विकास बँकेनेदेखील भारताचा अंदाजित विकास दर 7.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.