Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला, पण तरीही...
Rupee Vs Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया 13 पैशांनी आणखी मजबूत झाला. बुधवारी रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला होता.
Rupee Vs Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया वधारला असल्याचे दिसून आले. रुपया डॉलरच्या तुलनेत 13 पैशांनी वधारत 78.90 रुपये प्रति डॉलर या किंमतीवर खुला झाला आहे. इंटरबँक फॉरेन करन्सी बाजारात रुपयाने 78.90 रुपयांचा स्तर गाठला. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 79.03 रुपयांच्या नीचांकी स्तर गाठला होता.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, परदेशात मजबूत झालेला डॉलर आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली माघार यामुळे रुपयात घसरण सुरू आहे. रुपयात या महिन्यात आतापर्यंत 1.97 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर, या वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाच्या दरात 6.39 टक्क्यांनी घट झाली आहे.
या दरम्यान, सहा प्रमुख चलनाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर सूचकांक 0.13 टक्क्यांच्या तेजीसह 104.64 वर आला होता.
बुधवारी रुपयात झाली होती घसरण
आंतरबँक परदेशी चलन मुद्रा विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 78.66 वर खुला झाला होता. तर, बाजारातील व्यवहार बंद होईपर्यंत रुपयाने सर्वाधिक नीचांकी दर 79.03 रुपये गाठला होता. या दरम्यान रुपयाने आतापर्यंतचा सर्वाधिक नीचांकी दर 79.05 रुपये गाठला होता.
तज्ज्ञ काय म्हणतात?
रिलायन्स सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितले की, रुपया आज प्रति डॉलर 78.65 ते 79.05 च्या श्रेणीत राहू शकतो. आशिया खंडातील इतर देशांच्या चलनात संमिश्र कल असल्याचे दिसते. मात्र, चलनावर दबाव कायम राहू शकतो. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेत व्याजदर वाढण्याचा धोका असल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्याचा परिणाम बाजारावर जाणवू शकतो.