भारत जर्मनीसह जपानला टाकणार मागे, लवकरच होणार जगातील 3 री सर्वात मोठी आर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था अशीच वाढत राहिली तर भारत जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Indian Economy : सध्या जगातील अनेक देश मंदीच्या गर्तेत आहेत. त्यामुळं या देशांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. अशातच भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था अशीच वाढत राहिली तर भारत जगातील अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमेरिकेच्या जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने (Jefferies) हा दावा केला आहे.
दरम्यान, जेफरीजने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक विकासदरात सतत होणारी वाढ, अनुकूल भू-राजकीय परिस्थिती, बाजार भांडवलातील वाढ आणि मजबूत कॉर्पोरेट संस्कृती यामुळे भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचं म्हटलं आहे. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जगातील अनेक रेटिंग एजन्सी आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सनीही हे भाकीत केले आहे. रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात हा दावा केला होता.
भारत जर्मनी आणि जपानला टाकणार मागे
जेफरीजचे इंडिया इक्विटी विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांपासून भारत 7 टक्के वार्षिक विकास दराने वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था 3.6 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह आठव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर गेली आहे. पुढील चार वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल. जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शेअर बाजाराचे भाग भांडवलात मोठी वाढ होणार
डॉलरच्या बाबतीत, भारताचे इक्विटी मार्केट गेल्या 10 ते 20 वर्षांपासून 10-12 टक्के दराने सतत वाढत आहे. भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी इक्विटी मार्केट बनली आहे. 2030 पर्यंत भारताच्या शेअर बाजाराची मार्केट कॅप 10 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता जेफरीजने वर्तवली आहे.
अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश
सध्या, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. ज्याचा आकार सुमारे 27 ट्रिलियन डॉलर्स आहे. सुमारे 17 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपान ही अनेक वर्षापासून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. पण आता चौथ्या स्थानावर घसरली आहे. जर्मनीने एका स्थानावर झेप घेतली असून आता चौथ्याऐवजी तिसऱ्या स्थानावर आहे. सुमारे 3.75 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह भारत पाचव्या स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या: