(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugar Export : कमी पावसाचा फटका... साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज, सण-उत्सव, निवडणुकीमुळे साखर निर्यातीवर बंदी?
Sugar Export Ban : कमी पावसाचा फटका साखर उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : गहू आणि तांदळानंतर आता केंद्र सरकार साखर निर्यातीवर (Sugar Export) बंदी घालण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यापासून साखर उत्पादनाचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्यावेळी निर्यात बंदीचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय झाल्यास, मागील सात वर्षानंतर पहिल्यांदा साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाईल.
यंदाच्या मान्सूनमध्ये पाऊस न पडल्याने ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आगामी सणासुदीचा हंगाम आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालू शकते.
'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सरकारी अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सरकाचे पहिले लक्ष्य हे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची गरज पूर्ण करणे, तसेच अतिरिक्त साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर आहे. येत्या हंगामासाठी सरकारकडे निर्यात कोट्यासाठी पुरेशी साखर उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
भारताने यावर्षी 30 सप्टेंबरपर्यंत केवळ 6.1 दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे, तर गेल्या हंगामात 11.1 दशलक्ष टन साखर निर्यात झाली होती. भारताने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यास जगभरात साखरेच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. न्यूयॉर्क आणि लंडन बेंचमार्कच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते जिथे साखर आधीच अनेक वर्षांच्या उच्चांकावर व्यापार करत आहे. असे झाले तर अन्नधान्याच्या महागाईत जगभरात मोठी वाढ दिसून येईल.
ऊसाची लागवड केलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात मान्सूनमध्ये फक्त 50 टक्के पाऊस झाला आहे. या दोन राज्यांमध्ये देशातील 50 टक्के साखरेचे उत्पादन होते. पावसाअभावी या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होईल. मात्र पुढील हंगामात ऊस लागवडीवर परिणाम होऊ शकतो. 2023-24 हंगामात भारताचे साखर उत्पादन 3.3 टक्क्यांनी घटून 31.7 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे.
दरम्यान, मागील दोन महिन्यात महाराष्ट्रातही पावसाने सर्वत्र हजेरी लावली नाही. साखर उत्पादन (Sugar Production) करणार्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नसल्याने त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्याच्या परिणामी शेतकरी आणि साखर कारखान्याचे आर्थिक गणित तर बिघडणार आहेच सोबतच साखरेच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता ऊस साखर कारखानदारी असणार्या अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. नेमका हाच पट्टा साखर कारखानदारीशी निगडीत आहे.