E100 Flex Fuel Vehicles : E100 इंधनाला मंजुरी, वाहनावर काय परिणाम?
पेट्रोल नाही, डिझेल नाही आणि चार्जिंगची कटकटही नाही! आता भारतीय रस्त्यांवर गाड्या चालणार E100 वर? काय आहे हे E100 इंधन, जाणून घ्या..
आधीच E20 पेट्रोलमुळे देशातील नागरिक त्रस्त झालेले असताना आता केंद्र सरकारने E100 इंधनाला मंजुरी दिलीये...पण हे E100 इंधन नक्की काय आहे? आणि याचा गाड्यांवर काय फरक पडणार? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया! आता भारतीय रस्त्यांवर लवकरच अशा गाड्या धावताना दिसतील, ज्यांना पेट्रोल, डिझेल, CNG किंवा बॅटरीची सुद्धा गरज भासणार नाही!
E100 इंधन म्हणजे काय?
E100 म्हणजे 100% शुद्ध इथेनॉल. हे एक 'बायोफ्युएल' आहे, जे मुख्यत्वे ऊस आणि मक्यापासून बनवले जाते. यामध्ये 1 टक्काही पेट्रोल नसतं!
तुमच्या आत्ताच्या गाडीत हे इंधन चालेल का?
तर मुळीच नाही! तुमच्याकडे आत्ता असलेली पेट्रोल गाडी किंवा E20 गाडी यामध्ये E100 चालेल असं नाही. यासाठी कार कंपन्या खास 'फ्लेक्स-फ्युएल' (Flex-Fuel) तंत्रज्ञानावर आधारित नवीन गाड्या बनवतील आणि त्यातच हे वापरता येईल.
मग तुमच्या सध्याच्या गाडीचं काय होणार?
तर काळजी करू नका! जुन्या गाड्यांवर याचा काहीही वाईट परिणाम होणार नाही. तुम्हाला तुमची गाडी बदलायची किंवा मॉडिफाय करायची अजिबात गरज नाही. पेट्रोल गाड्या बंद होणार नसून, हा फक्त एक पर्यायी पर्याय असेल.
फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञान काय आहे?
या गाड्यांमध्ये एकच फ्युएल टँक असतो. पण त्यात एथेनॉल आणि पेट्रोलचे कोणतेही मिश्रण (E85 ते E100 पर्यंत) टाकले, तरी गाडीचे इंजिन अगदी सहज चालते.
याचे भारताला आणि पर्यावरणाला काय फायदे?
या निर्णयाचे दोन मोठे फायदे आहे:
1. कमी प्रदूषण : पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमुळे कार्बन डायऑक्साइड खूप कमी बाहेर पडतात, ज्यामुळे हवा स्वच्छ राहते..
2. पैशांची प्रचंड बचत: भारताला परदेशातून कमी कच्चं तेल आयात करावं लागेल. ज्यामुळे देशाचे लाखो-करोडो रुपये वाचतील!
अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये हे तंत्रज्ञान आधीपासूनच खूप यशस्वी आहे. आता भारतातही याची सुरुवात होतेय! तुम्हाला इथेनॉलवर चालणारी नवीन गाडी घ्यायला आवडेल का?























