Income Tax: करदात्यांसाठी मोठी सुविधा; आयकर विभागाकडून मोबाईल अॅप लॉन्च
Income Tax : आयकर विभागाने करदात्यांसाठी मोबाईल अॅपची सुविधा सुरु केली आहे. एआयएस फॉर टॅक्सपेअर असं या अॅपचं नाव आहे.
Income Tax : जर तुम्ही दरवर्षी आयकर विभागाकडे (Income Tax) कर भरत असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आयकर विभागाने करदात्यांसाठी (Taxpayer) मोबाईल अॅपची (Mobile App) सुविधा सुरु केली आहे. एआयएस फॉर टॅक्सपेअर (AIS For Taxpayer) असं या अॅपचं नाव आहे. या अॅपद्वारे करदात्याला मोबाईलवर फोनवर टीडीएससह वार्षिक माहितीचं विवरण (Annual Information Statement) तसंच करदात्यांची माहिती (Taxpayer Information Summary) पाहता येणार आहे. याद्वारे करदात्यांना उत्पन्नावरील कर कपात/उत्पन्नावरील कर संकलन (टीडीएस/टीसीएस), व्याज, लाभांश आणि शेअर व्यवहाराची माहिती मिळेल, असं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
आयकर विभागाकडून नि:शुल्क अॅप
AIS for Taxpayer हे मोबाईल अॅप्लिकेशन आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, हे अॅप नि:शुल्क आहे. अॅप Google Play आणि App Store वरुन डाऊनलोड करता येईल. करदात्याला या अॅपवर आपला फीडबॅक देण्याचा पर्यायही मिळणार आहे. करदाते मोबाईल अॅपद्वारे वार्षिक माहिती स्टेटमेंट (AIS)/करदाता माहिती सारांश (TIS) मध्ये उपलब्ध माहिती पाहू शकतील, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CEBI) सांगितलं.
ITD has launched a mobile app ‘AIS for Taxpayers’ to enable taxpayers to view their info as available in Annual Information Statement(AIS)/Tax Information Summary(TIS).
— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 22, 2023
This will provide enhanced taxpayer service & ease of compliance.(1/2)
Press Release:https://t.co/WujCqyYQSe pic.twitter.com/Q6VaC2L2S2
करदात्यांना कोणती माहिती मिळणार?
"करदात्याला AIS/TIS बद्दल माहिती देणे हा अॅपचा उद्देश आहे. हे अॅप करदात्यांशी संबंधित विविध स्त्रोतांकडून एकत्रित केलेली माहिती देतं. करदाते AIS/TIS मध्ये उपलब्ध असलेल्या TDS/TCS, व्याज, लाभांश, शेअर व्यवहार, कर भरणे, आयकर परतावा आणि इतर गोष्टींशी संबंधित माहिती पाहण्यासाठी या मोबाईल अॅपचा वापर करु शकतात," असं आयकर विभागाने म्हटलं.
असं करा रजिस्ट्रेशन!
हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर पॅन क्रमांक टाकून रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर ई-फायलिंग पोर्टलवर रजिस्टर असलेल्या मोबाईल फोन क्रमांक आणि ई-मेलवर ओटीपी येईल. प्रमाणीकरण झाल्यानंतर करदाता मोबाईल अॅप अॅक्सेस करण्यासाठी 4 अंकी पिन सेट करु शकतो.
अॅपमध्ये दाखवलेल्या माहितीवर फीडबॅक देण्याचा पर्याय आणि सुविधाही करदात्याला देण्यात आली आहे. आयकर विभागाने सांगितलं की, 'करदात्याला अधिक चांगली सेवा देण्याच्या क्षेत्रात विभागाचा हा आणखी एक उपक्रम आहे.'