देशातल्या सर्वांत मोठ्या IPO चा गुलिगत धोका, गुंतवणूकदारांना चटके; सूचिबद्ध होताच मोठी पडझड!
गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चा असलेल्या या आयपीओने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. गुंतवणूकदारांच्या पैशांचे मूल्य कमी झाले आहे.
मुंबई : या आर्थिक वर्षात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे आयपीओ येऊन गेले. यातील काही आयपीओंनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं. यातील काही आयपीओंनी तर आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले. केएआरएन हिट एक्स्चेंजर, पुना गाडगीळ या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांसाठी पैशांचा पाऊस घेऊन आले. दरम्यान, संपूर्ण देशाचे ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीच्या आयपीओकडे होते. हा आयपीओ आपल्या गुंतवणूकदारांना किती पैसे देणार? असे विचारले जात होते. मात्र देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ म्हणून नावलौकिक मिळालेल्या या आयपीओने मात्र गुंतवणूकदारांची पुरती निराशा केली आहे.
गुंतवणूकदारांची निराशा
भारतीय शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा शेअर गडगडला आहे. आयपीओ आला तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची इश्यू प्राईज 1960 रुपये ठरवण्यात आली होती. मात्र मुंबई शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला तेव्हा या शेअरचे मूल्य 1,931 रुपये होते. म्हणजेच तगड्या रिटर्न्सची अपेक्षा असणाऱ्या या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. इश्यू प्राईजपेक्षा हा शेअर 1.48 टक्क्यांनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला. एनएसईवरही हा शेअर इश्यू प्राईजच्या तुलनेत 1.33 टक्क्यांनी (1,934 रुपये) कमी रुपयांवर सूचिबद् झाला.
प्रत्येक शेअरमागे 95 रुपयांचा तोटा
ह्युंदाई मोटर्सचा शेअर सूचिब्ध झाल्यानंतर 10.30 वाजता त्याचे मूल्य 4.80 रुपयांनी घसरून 1,865 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ह्युंदाईचा आयपीओ आला तेव्हा एका लॉटसाठी गुंतवणूकदारांनी 13,720 रुपये मोजले होते. एका लॉटमध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना सात शेअर्स दिले होते. शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या शेअरमध्ये साधारण 95 रुपयांची घट पाहायला मिळाली. म्हणजेच गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये साधारण 665 रुपयांचा तोटा झाला.
किंमत पट्टा 1,865-1,960 रुपये प्रति शेअर
ह्युंदाई मोटर्स या आयपीओला ग्रे मार्केटमध्येही फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे हा आयपीओ गुंतवणूकदारांना परतावा देण्यासंदर्भात साशंकता व्यक्त केली जात होती. ह्युंदाई मोटर्सच्या आयपीओचा किंमत पट्टा 1,865-1,960 रुपये प्रति शेअर होता. ह्युंदाई मोटर्सतर्फे आयपीओच्या माध्यमातून एकूण 14,21,94,700 शेअर्सची विक्री करण्यात आली होती. हे सर्व शेअर्स ओएफएस श्रेणीतील होते.
भारतीय बाजारातील सर्वांत मोठा आयपीओ
ह्युंदाई मोटर्सचा हा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ होता. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 15 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. हा आयपीओ एकूण 27,870.16 कोटी रुपयांचा होता. याआधी एलआयसीचा आयपीओ सर्वांत मोठा होता. या आयपीओचा आकार 21,000 कोटी रुपये होता. दरम्यान, ह्युंदाई मोटर्सचा आयपीओ सूचिबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागत असला तरी भविष्यात ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
नवरत्न कंपनीचा धमाका! एका वर्षात 100 टक्के रिटर्न्स; तुमचंही नशीब पलटणार?
मोठी बातमी! टाटा समूहाचा तब्बल 55 हजार कोटींचा तगडा आयपीओ येणार, पडणार पैशांचा पाऊस?