Happy Birthday Anand Mahindra : ‘महिंद्रा’चे सीईओ, नेटकऱ्यांच्या हटके कल्पनांचं करतात कौतुक! जाणून घ्या उद्योगपती आनंद महिंद्रांबद्दल...
Anand Mahindra : ऑटो सेक्टरमधील मोठे नाव असणारे आनंद महिंद्रा यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. विशेष म्हणजे याच दिवशी ‘महाराष्ट्र दिन’ देखील साजरा केला जातो.
Anand Mahindra : सोशल मीडियावर हटके कल्पनांचं कौतुक करणारे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. आनंद महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आज आनंद महिंद्रा त्यांचा 67वा वाढदिवस साजरा करत आहेत. आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा ग्रुपचे नाव भारतातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणले जाते. महिंद्रा ही कंपनी आनंद यांचे आजोबा आणि त्यांच्या भावांनी पंजाबमधील लुधियाना शहरातून सुरू केली होती. याच कंपनीची धुरा आता आनंद महिंद्रा यशस्वीपणे संभाळत आहेत.
ऑटो सेक्टरमधील मोठे नाव असणारे आनंद महिंद्रा यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. योगायोग म्हणजे याच दिवशी ‘महाराष्ट्र दिन’ देखील साजरा केला जातो. आनंद यांच्या वडिलांचे नाव हरीश महिंद्रा आणि आईचे नाव इंदिरा महिंद्रा आहे. आनंद महिंद्रा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल (एचबीएस), बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथून 1981 मध्ये एमबीए पूर्ण केले.
सोशल मीडियावरही प्रसिद्ध उद्योगपती
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते अनेक मनोरंजक व्हिडीओ शेअर करतात. ट्विटरवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आनंद महिंद्रा त्यांच्या चाहत्यांना निराशही करत नाहीत, चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरही देतात. अनेकदा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदतही करतात. तसेच, नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या हटके कल्पनांचे तोंडभरून कौतुकही करतात. यामुळेच ते सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड प्रसिद्ध आहेत.
एका प्रसिद्ध वेबसाईटच्या माहितीनुसार, आनंद महिंद्रा यूएस-इंडिया बिझनेस काऊन्सिलचे बोर्ड सदस्य आहेत. तसेच, ते सिंगापूरच्या आर्थिक विकास मंडळाच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य आणि सह-संस्थापक देखील आहेत. आनंद महिंद्रा दरवर्षी दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेतही सहभागी होतात. महिंद्राच्या वाहनांना भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे.
महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना ग्रामीण भारतात तसेच, शहरांमध्येही प्रचंड मागणी आहे. ट्रॅक्टर असो की बाईक, कार किंवा इतर कोणतेही वाहन, प्रत्येक वेळी महिंद्रांच्या गाड्यांची विचारणा केली जाते. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली कंपनी सतत प्रगतीच्या मार्गावर आहे.
हेही वाचा :
Viral Video : मासे पकडण्यासाठी मुलाचा देसी जुगाड, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडीओ