GST: महागाईच्या झळा वाढणार! जीएसटी कर वाढण्याचे संकेत, असे असतील नवे दर?
GST Tax Slab Rates will be changes : जीएसटी कर प्रणातील कर टप्प्यांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. याच्या परिणामी महागाईच्या आणखी तीव्र होण्याची भीती आहे.
GST Tax Slab Rates : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला आता आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढीची टांगती तलवार कायम असताना दुसरीकडे जीएसटी कर वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी कर निश्चित करणाऱ्या जीएसटी परिषदेची बैठक पार पडणार असून कर रचनेच बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची चर्चा आहे.
रविवारी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारमधील अर्थमंत्र्यांची समिती जीएसटी परिषदेला या महिन्याअखेरीस आपला अहवाल सादर करू शकते. यामध्ये सर्वात कमी करात वाढ करण्यात येऊ शकते. त्याशिवाय आणखी काही बदल होऊ शकतात. सध्या जीएसटीमध्ये सगळ्यात कमी कर टप्पा हा पाच टक्क्यांचा आहे. यामध्ये वाढ करण्यात येणार असून तो आठ टक्क्यांवर करण्याचा प्रस्ताव आहे.
असे असतील नवीन जीएसटी कर ?
जीएसटी कररचनेत सध्या पाच टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे कर टप्पे आहेत. आवश्यक वस्तूंना जीएसटीतून सवलत देण्यात आली आहे अथवा त्यांच्यावर सगळ्यात कमी कर लावला जाणार आहे. तर साधारणपणे चैनींच्या वस्तूंवर सर्वाधिक कर आकारला जातो.
कर प्रणाली तीन स्तरांची करण्याचा विचार मंत्र्यांच्या गटाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, जीएसटी कर हा आठ, 18 आणि 28 टक्क्यांचा होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास 12 टक्के कर असलेल्या वस्तूंवर 18 टक्के कर लागू शकतो.
कर सवलत मिळालेल्या वस्तूंच्या संख्या घटणार?
जीएसटी कर सवलत असलेल्या वस्तूंच्या संख्येत घट होणार असल्याचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. सध्या कोणत्याही ब्रॅण्डशिवाय आणि हवाबंद नसलेले पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ जीएसटी कर रचनेबाहेर आहेत. जीएसटी परिषदेची बैठक या महिन्याच्या अखेरीस अथवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पार पडण्याची शक्यता आहे.