GST Collection : फेब्रुवारीत जीएसटीमधून 1.5 लाख कोटींची वसूली; मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ
GST Collection : फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर करण्यात आले असून 1,49,577 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
GST Collection : देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाबाबत मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटी कर संकलन 1,49,577 कोटी रुपये इतके झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये 1,33,026 रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.
जानेवारी महिन्यात जीएसटी संकलन किती?
जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सलग 11व्या महिन्यात 1.55 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST महसूल प्राप्त झाला. जानेवारी महिन्यात सरकारला 1,55,922 कोटी रुपये म्हणजेच 1.55 लाख कोटी रुपयांचे जीएसटी महसूल मिळाला होता.
सलग 12 महिने भारताचे जीएसटी संकलन हे एक लाख 40 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. यंदाचा आकडा हा 1,49,577 कोटींवर आला आहे. मागील 12 महिन्यांच्या तुलनेत हा महसूल अधिक आहे.
अर्थ मंत्रालयाने बुधवारी, फेब्रुवारी 2023 मधील जीएसटीची आकडेवारी जाहीर केली. या महिन्यात उपकर म्हणून 11,931 कोटी रुपये जमा झाला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे.
👉 ₹1,49,577 crore gross #GST revenue collected in February 2023; 12% higher than #GST revenues in same month last year
— Ministry of Finance (@FinMinIndia) March 1, 2023
👉 Monthly #GST revenues more than ₹1.4 lakh crore for 12 straight months in a row
Read more ➡️ https://t.co/hZMqDAHuWf
(1/2) pic.twitter.com/XCmoncVS3G
जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये जीएसटीमध्ये घट
जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये जीएसटी महसुलात घट झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये 1.57 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. आतापर्यंतचा हा दुसरा क्रमांकाचा सर्वाधिक आकडा आहे. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचा महसूल जीएसटीद्वारे मिळाला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण GST संकलन 1,49,577 कोटी रुपये आहे. यापैकी केंद्रीय GST (CGST) 27,662 कोटी रुपये आहे. तर राज्य GST (SGST) कर संकलन 34,915 कोटी रुपये आहे. तर IGST 75,069 कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय 11,931 कोटी रुपयांच्या उपकराचाही समावेश आहे.
जीएसटी संकलन दरवर्षी 12 टक्क्यांनी वाढले
वर्षभरापूर्वी याच महिन्यात जीएसटी संकलन 1.33 लाख कोटी रुपये होते. फेब्रुवारी 2023 शी तुलना करता जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ 28 दिवस असल्याने जीएसटी संकलन इतर महिन्यांच्या तुलनेत कमी असल्याकडे ही अर्थ मंत्रालयाने लक्ष वेधले आहे.