Explainer : शेल कंपन्यांसाठी कोलकाता 'नंदनवन'; असा होतो काळा पैसा पांढरा
Shell Companies In Kolkata : सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपात शेल कंपन्यांचा उल्लेख होत आहे. या शेल कंपन्यांचे पत्ते कोलकातामधील असल्याचे म्हटले जाते. कोलकाता शेल कंपन्यांचे नंदनवन असल्याचे म्हटले जाते.
Shell Companies In Kolkata : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप करताना शेल कंपन्यांचा (बनावट कंपन्या) सातत्याने उल्लेख केला. या बनावट कंपन्या कोलकातामधील असल्याचे समोर आले होते. याआधीदेखील अनेक शेल कंपन्या कोलकातामधील असल्याचे दिसून आले होते. सेबीच्या एका अहवालानुसार, बंदी घातलेल्या 40 टक्के शेल कंपन्या कोलकातामधील असल्याचे सेबीच्या एका अहवालात समोर आले होते.
शेल कंपन्यांबाबत केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. या अहवालात अनेक गोष्टी समोर आल्यात. कोलकाता हे बनावट कंपन्यांसाठी नंदनवन असल्याची चर्चा सुरू असते. केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार काळा पैशांतील 48 टक्के पैसा या शेल कंपन्यांच्या मार्फत पांढरा केला जातो. यामध्ये कोलकातामधील शेल कंपन्यांचा मोठा वाटा असतो. या शेल कंपन्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने या कंपन्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू असते. कोलकातामधील एकदा तपासणीच्या वेळेस एक सीए 800 कंपन्यांच्या बॅलेन्स शीटवर सही करताना आढळून आला.
कोलकाताच पसंतीचे ठिकाण का?
कमी कर असल्याने शेल कंपन्यांची पसंती कोलकाताला असल्याचे म्हटले जाते. सन 2017 मधील एका वृत्तानुसार, कोलकातामधील कंपन्यांना 24 टक्के कर भरावा लागत होता. कोलकातामध्ये शेल कंपनी तयार करण्यासाठी एन्ट्री ऑपरेटरला 50 ते 70 हजार रुपये अथवा ठरलेला हिस्सा द्यावा लागतो. त्यांच्या मार्फत कंपनी नोंदणी आणि कर भरला जात असल्याचे म्हटले जाते.
काळा पैसा पांढरा कसा होतो?
काळा पैसा पांढरा करण्यामध्ये एन्ट्री ऑपरेटरची महत्त्वाची भूमिका असते. एखाद्याला काळा पैशातील एक कोटी रुपये पांढरे करायचे असतील तर तो मूळ मालक एक लाख रुपये एन्ट्री ऑपरेटरला देईल. त्यानंतर एन्ट्री ऑपरेटर प्रति 10 रुपये या दराने 10 हजार शेअरमध्ये विभागणी करेल. प्रत्येक शेअर हा शेल कंपन्यांच्या संचालकांना सुमारे एक हजार रुपयांच्या प्रीमियमवर विकला जाईल.
बनावट कंपन्यांच्या द्वारे एक लाख रुपयांचे मूल्य एक कोटी रुपये होईल. त्यानंतर ही रक्कम मूळ मालकाकडे जाते. यासाठी एन्ट्री ऑपरेटर शुल्क आकारतो. अनेकदा या कंपन्यांचे संचालक हे चहा विक्रेते, सुरक्षा रक्षक, वाहन चालक, रोजंदारीवर काम करणारे असतात.
सीएचा गट कार्यरत
शेल कंपन्यांच्या व्यवहारांमध्ये सीएचा (लेखा परीक्षक) एक गट कार्यरत असल्याची चर्चा सुरू असते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, किमान 5000 हजार रुपयांसाठी कागदपत्रांवर सही करणारे अनेक 'संचालक' मिळतात. त्याशिवाय, एन्ट्री ऑपरेटर आणि दलालांकडून एकाच ठिकाणांवरून एकाच वेळी शेकडो कंपन्या चालवल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोलकात्यामधील 75 टक्के शेल कंपन्यांचे सीए हे व्यावसायिक सीए नसतात. त्यांच्याकडे योग्य अर्हतादेखील नसते. कंपनी स्थापन करण्यासाठी सीए असावा असे नाही. याबाबतचे पुस्तकी ज्ञान असलेली व्यक्तीदेखील ही कंपनी स्थापन करू शकते. सीए हा कंपनीतील व्यवहारांना प्रमाणित करतो. कंपनीला प्रमाणित करत नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले. विशेष म्हणजे मुंबईपेक्षा कोलकातामधील सीए हे कमी दरात काम करतात. त्यांचे शुल्क मुंबईच्या तुलनेत चारपटीने कमी आहे. कोलकाता शेअर बाजार 2013 मध्ये बंद केल्यानंतर शेल कंपन्यांचे व्यवहार काही प्रमाणात कमी झाले होते, असे म्हटले जाते.