(Source: Poll of Polls)
नोकरी सोडून दाम्पत्यानं सुरु केला शेळीपालनाचा व्यवसाय, वर्षाला मिळवतायेत लाखो रुपये
Success Story : एका दाम्पत्याने नोकरी सोडून शेळापालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. या माध्यमातून हे कुटुंब लाखो रुपयांचा नफा कमावत आहे.
Success Story : ओडिशाच्या कालाहंडी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या जयंती महापात्रा आणि त्यांचे पती बिरेन साहू यांनी बंगळुरुमध्ये सुरु असलेली चांगली नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. या दाम्पत्याने शेळापालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. या माध्यमातून हे कुटुंब लाखो रुपयांचा नफा कमावत आहे. आता जोडपं 1000 लोकांना रोजगार देत आहे.
जयंती महापात्रा आणि त्यांचे पती बिरेन साहू यांनी दशकभरापूर्वी दोघेही बंगळुरूमध्ये एका चांगल्या कंपनीत काम करत होते. मोठा पगार होता, पण शेती करण्याच्या इच्छेने दोघांनाही त्यांच्या गावाकडे आकर्षित केले. आता पती-पत्नी दोघेही त्यांच्या वडिलोपार्जित सालेभाटा गावात शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. यातून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी अनेकांना रोजगारही दिला आहे.
'गोट बँके'ची सुरुवात
जयंती महापात्रा आणि त्यांचे पती बिरेन साहू यांनी त्यांच्या स्टार्ट-अप माणिकस्तु ॲग्रो अंतर्गत शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या स्टार्ट-अपद्वारे त्यांनी केवळ गावातील लोकांनाच रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर जवळपासच्या 40 हून अधिक गावांतील लोकांना सक्षम केले आहे. विशेष बाब म्हणजे या जोडप्याने 'गोट बँक' उघडली असून सामुदायिक शेतीच्या माध्यमातून शेळीपालनाला प्रोत्साहन देत आहेत. माणिकस्तु ॲग्रो सध्या महाराष्ट्रातील फलटण येथील NARI (राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था) येथील शेळीपालन संशोधकांसोबत संबंधित आहे.
40 गावांतील लोक स्टार्ट अपशी जोडले गेले
जयंती महापात्रा म्हणाल्या की, माझे पती आणि मला नेहमीच शेतीची आवड होती. अशा परिस्थितीत आम्ही अनेक हायटेक फार्म, कृषी कंपन्या, डेअरी, पोल्ट्री आणि इतर कृषी उद्योगांना भेटी दिल्या. ओडिशात असे काही करता येत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटले. म्हणूनच आम्ही कालाहंडीत माणिकस्तु सुरू केली. मणिकस्तु म्हणजे 'देवी माणिकेश्वरीचा आशीर्वाद'. या व्यवसायाची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. आज 40 गावांतील सुमारे 1000 शेतकरी माणिकस्तुशी संबंधित आहेत.
शेतकऱ्यांना शेळ्या दिल्या जातात
जयंती स्टार्टअप मॉडेलबद्दल बोलताना म्हणाल्या की, शेतकऱ्यांना दोन मादी शेळ्या दिल्या जातात. त्या प्रत्येकी 1 वर्षाच्या आहेत. शेळ्या एका वर्षात कोकरांना जन्म देतात. शेळ्यांची प्रसूती झाल्यानंतर शेतकरी 50 टक्के नवीन शेळ्या शेळी बँकेत परत करतात. बकरी बँकेत 40 पशुवैद्यक असून त्यापैकी 27 स्थानिक महिला व तरुण आहेत. ते माणिकस्तुशी संबंधित शेळीपालकांना शेळ्यांची नियमित तपासणी, जंतनाशक आणि लसीकरण यासारख्या सेवा देतात. जयंती आणि बिरेन त्यांना मार्केट कनेक्टिव्हिटी देतात. आम्ही शेळीचे खत, दूध, तूप अशा विविध प्रकारची उत्पादने तयार करतो, जी देशाच्या विविध भागात विकली जातात
माणिकस्तु फार्ममध्ये सध्या 500 शेळ्या
बिरेन म्हणाले की, सालेभाटा येथील माणिकस्तु फार्ममध्ये सध्या 500 शेळ्या आहेत. आमचे मॉडेल महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॉ. निंबकर यांच्याकडून प्रेरित होऊन केले आहे. ज्यांनी शेळीपालनात क्रांती केली. आम्ही थोड्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने येथे सुरुवात केली आहे. स्टार्टअप कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहभागी करून घेत आहे. सध्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आमूलाग्र बदल झाला आहे. या शेतकरी कुटुंबातील महिलाही शेळ्या पालन करून स्वावलंबी होत आहेत.