Share Market Prediction : 2024 मध्ये भाजप सरकार न आल्यास शेअर बाजारात सुनामी; ख्रिस वूड यांचा अंदाज
Lok Sabha Election 2023 : 2024 मध्ये भाजपची सत्ता न आल्यास बाजारात मोठी घसरण होईल, असा अंदाज दिग्गज गुंतवणूकदार क्रिस्तोफर वूड (Christopher Wood) यांनी वर्तवला आहे.
मुंबई : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. 2024 मधील निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सत्तााधारी आणि विरोधकांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. शेअर बाजारावर या निवडणुकीचा परिणा होत असतो. 2024 मध्ये भाजपची सत्ता न आल्यास बाजारात मोठी घसरण होईल, असा अंदाज दिग्गज गुंतवणूकदार आणि जेफ्रिज या गुंतवणूक फर्मचे प्रमुख क्रिस्तोफर वूड (Christopher Wood) यांनी वर्तवला आहे. केंद्रातून भाजप सत्तेबाहेर गेल्यास बाजारात 25 टक्के घसरण संभवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शेअर बाजारातील मोठा रिस्क फॅक्टर
'बिझनेस स्टँडर्ड बीएफएसआय समिट 2023' ला संबोधित करताना, ख्रिस वूड यांनी शेअर बाजारासाठी सर्वात मोठ्या धोक्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले जर 2024 मध्ये सत्ताधारी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आला नाही तर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते. अर्थात याची शक्यता फारच कमी दिसते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
2004 ची पुनरावृत्ती 2024 मध्ये होऊ शकते!
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने पराभव केला होता. या निवडणुकीत भाजप विजयी होईल असा अंदाज होता. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सलग दोन दिवस शेअर बाजारात लोअर सर्किट लागले होते. आर्थिक सुधारणांना कट्टर विरोध करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीच्या पाठिंब्याने युपीए सरकार स्थापन झाले होते.
2004 ची आठवण करून देताना ख्रिस वूड म्हणाले की 2004 मध्ये जे घडले ते 2024 मध्ये झाले तर शेअर बाजारात 25 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. मात्र, बाजार पुन्हा त्याच गतीने वाढेल, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या विजयाने शेअर बाजारात तेजी
16 मे 2014 रोजी मतमोजणी सुरू असतानाच केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमत असलेले एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्या दिवशी प्रथमच बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 25,000 चा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. सेन्सेक्समध्ये 1450 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील दिवसाच्या व्यवहारात प्रथमच 7500 अंकांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. तथापि, बाजार बंद होण्यापूर्वी नफावसुली मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे सेन्सेक्स अवघ्या 216 अंकांच्या उसळीसह 24121 अंकांवर बंद झाला आणि निफ्टी 75 अंकांच्या उसळीसह 7200 अंकावर बंद झाला.
2019 मधील मोदींच्या विजयाने बाजारात उत्साह
2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकाने 40,000 अंकांचा टप्पा ओलांडला. तर, निफ्टीने 12000 अंकांची पातळी ओलांडली. बाजारातील व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 298 अंकांच्या घसरणीसह 38811 आणि निफ्टी 80 अंकांच्या घसरणीसह 11657 अंकांवर स्थिरावला होता.