(Source: Poll of Polls)
Chandrababu Naidu : निवडणुकीचे निकाल लागताच चंद्राबाबू नायडूंना अच्छे दिन, नवव्या वर्षीच नातू देवांश करोडपती,नेटवर्थ दुप्पट
Chandrababu Naidu :चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीची आंध्र प्रदेशमध्ये सत्ता आली आहे. तर, लोकसभा निवडणुकीत त्यांचे 16 खासदार विजयी झाले आहेत.
अमरावती : टीडीपीचे नेते (TDP) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनंतर अच्छे दिन आले आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत वाढ होत आहे. नव्या माहितीनुसार चंद्राबाबू नायडू यांचा नातू देवांश नायडू (Devansh Naidu ) करोडपती बनला आहे. देवांश नायडूची नेटवर्थ हेरिटेज फूड्सच्या स्टॉकमध्ये वाढ झाल्यानं वाढली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये टीडीपीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. तर, लोकसभा निवडणुकीत त्यांचे 16 खासदार विजयी झाले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या हेरिटेज फुड्स कंपनीत गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून हेरिटेज फुड्सचे स्टॉक दुप्पट वाढले आहेत. हेरिटेज फुड्समध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाची 35.7 टक्के मालकी आहे. चंद्राबाबू नायडू यांची पत्नी भुवनेश्वरी नायडू यांची 24.37 टक्के मालकी हेरिटेज फुड्समध्ये आहे. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांची 10.82 टक्के , सून ब्राह्मणी 0.46 तर नातू देवांश याची 0.06 टक्के भागिदारी हेरिटेज फुड्समध्ये आहे.
Took oath as Chief Minister of Andhra Pradesh at the swearing-in ceremony in Amaravati today. I devote myself to serving the people of my state.
— N Chandrababu Naidu (@ncbn) June 12, 2024
Thank you Andhra Pradesh! pic.twitter.com/reZbf4MuzV
देवांश नायडूच्या शेअर्सची किंमत 4.1 कोटींवर
देवांश नायडूकडे हेरिटेज फुड्सच्या कंपनीचे 56075 शेअर्स आहेत. या शेअर्सची 3 जूनची किंमत 2.4 कोटी रुपये होती. ती आता 4.1 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हेरिटेज फुड्सच्या स्टॉकमध्ये वाढ झाल्यानं नायडू कुटुंबाच्या संपत्तीत 1225 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
हेरिटेज फुड्सची स्थापना 1992 मध्ये झाली होती. या कंपनीद्वारे डेअरी उत्पादनांची विक्री केली जाते. त्यामध्ये दही, तूप, पनीर, दूध आणि इतर पदार्थांचा समावेश आहे. हेरिटेज फुड्सची उत्पादनं 11 राज्यात विकले जातात. जवळपास 15 लाख घरांमध्ये हेरिटेज फुड्सची उत्पादनं वापरली जातात.
संबंधित बातम्या :
आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्राबाबूंची संपत्ती किती? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Stock Market Nifty : शेअर बाजारात तेजी, निफ्टीने गाठला 23,420 चा विक्रमी उच्चांक