7th Pay Commission DA Hike : केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या किती झाला पगार
Central Government Hike DA : केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
DA Hike Latest News: केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने जानेवारी ते जून 2022 पर्यंतसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचारी (Central Government employees) आणि पेन्शनधारकांना 34 टक्क्यांने महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींवर आधारीत आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे इतर भत्तेदेखील वाढणार आहेत.
किती वाढणार पगार?
एखाद्या कर्मचाऱ्याला 56 हजार इतकं मूळ वेतन असल्यास त्याला 19 हजार 40 रुपये इतका महागाई भत्ता मिळणार. या कर्मचाऱ्याला वर्षालाा दोन लाख 28 हजार 480 रुपये इतके वेतन मिळेल.
एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असल्यास महागाई भत्ता म्हणून त्याला 6120 रुपये मिळतील. यानुसार, वर्षाकाठी 73 हजार 440 रुपये इतकी रक्कम मिळेल.
केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. त्यानुसार आता, जुलै 2022मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते.
सामान्यांचे काय?केंद्र
केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जात असताना दुसरीकडे सामान्यांचे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही महिन्यात महागाई वाढली आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत.
महागाई भत्त्याची सुरुवात कधी?
वाढती महागाई लक्षात घेता राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. देशात सर्वप्रथम, मुंबईमध्ये 1972 साली महागाई भत्ता देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनुकरण केंद्र सरकारने करत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला.