देशाचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती किती?
Nirmala Sitharaman : देशाच्या तिजोरीचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे इतर केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत खूपच कमी संपत्ती आहे.
Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर होण्यापूर्वी प्रत्येकवेळी अर्थमंत्री आणि अर्थसंकल्पावर चर्चा होत असते. अशावेळी देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांचा पगार किती आणि त्यांची संपत्ती किती आहे याची देखील चर्चा होते. विशेष म्हणजे देशाच्या तिजोरीचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडे इतर केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत खूपच कमी संपत्ती आहे.
सीतारामन यांनी लंडनमधील हॅबिटॅट सेंटरमध्ये सेल्सपर्सन म्हणून काम केले आहे. त्यांनी असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनीअर्स (यूके) येथे अर्थशास्त्रज्ञाचे सहाय्यक म्हणूनही काम केले. तसेच, भारत सरकारच्या वेतन आकडेवारीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मासिक वेतन सुमारे 4,00,000 रुपये असल्याचे संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत खूप कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे सुमारे 1.34 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या आणि पतीच्या नावावर असलेल्या घराची किमंत 99.36 लाख रुपये आहेत. याशिवाय त्यांच्याकडे सुमारे 16.02 लाख रुपयांची बिगर शेती जमीन सुद्धा आहे.
सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन दुसऱ्या अर्थमंत्री ठरणार
सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन या भारताच्या इतिहासातील दुसऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनीही 5 पूर्ण आणि 1 अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांना सीतारामन या मागे टाकतील. या सर्वांना सलग 5 अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली होती. मात्र, सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करून सीतारामन या त्यांचा रेकोर्ड तोडणार आहेत.
अंतरिम बजेट म्हणजे काय?
अंतरिम अर्थसंकल्प हा वार्षिक किंवा सर्वसाधारण अर्थसंकल्पापेक्षा लहान असतो. यामध्ये नवीन सरकार स्थापन होईपर्यंत महसूल आणि खर्चाचे अंदाज सादर केले जातात. जेणेकरून गुंतवणूकदारांचा बाजारावर विश्वास कायम राहील. नवीन सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प येईपर्यंत हे लागू राहतात. यामध्ये मोठ्या घोषणा करणे टाळले जाते.
अंतरिम बजेट पेपरलेस असणार...
मागील तीन वर्षांच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प पेपरलेस असणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक वित्तीय विवरण, अनुदानाची मागणी आणि वित्त विधेयकासह सर्व अर्थसंकल्प दस्तऐवज केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल ॲपमध्ये असतील. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर ते Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 'Union Budget Mobile App' वर उपलब्ध होईल.
इतर महत्वाच्या बातम्या :