Budget 2021: बजेटमध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय, संजय राऊत यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागणार आहे. त्यामुळं लवकरच पेट्रोल डिझेल शंभरी गाठणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Union Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, या बजेटकडून निराशा झाल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अर्थसंकल्पाचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून असताना बजेटमध्ये राज्याला काहीही मिळाले नसल्याची टीका संजय राऊत यांनी केलीय.
काय म्हणाले संजय राऊत?
अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून आहे. पण, बजेटमध्ये राज्यासाठी काहीही विशेष तरतूद नाही. राज्याची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत. आकडे येत असतात ते किती खरे हे 6 महिन्यांनी समजते. आर्थिक थापा बंद करायला हव्यात.
..म्हणून नाशिक व नागपूरला निधी नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय? जमीन केंद्राची आहे म्हणतात. पण, कुठून मंगळावरून जमीन आणलीय का? असे सवाल राऊत यांनी केंद्राला विचारले आहे. शेतकऱ्यांचे ऐका जरा. भांडवलदारांसाठी हे कायदे बनवलेत. काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेवून निधी वाटप केले आहे का? देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते, असा प्रश्न यावरुन उपस्थित होत आहे. पेट्रोल-डिझेलवरील सेस वाढवला या प्रश्नावर पेट्रोल हजार रूपये करायचे असेल त्यांना असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
पेट्रोल, डिझेलवर लागणार कृषी अधिभार! पेट्रोल आणि डिझेलवर अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेवलपेमंट सेस (कृषिक्षेत्रासाठी पायाभूत सुविधा आणि विकास अधिभार) AIDC लावला जाणार आहे. त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलवर असलेली बेसिक एक्साईज ड्यूटी (मूल अबकारी कर) प्रति लीटर रु. 1.4 आणि रु. 1.8 करण्यात आला आहे. तर स्पेशल अॅडिशनल एक्साईज ड्युटी (विशेष अतिरिक्त अबकारी कर) हा पेट्रोलवर प्रतिलीटर रु. 11 आणि डिझेलवर प्रति लीटर रु. 8 राहणार आहे. म्हणजे पेट्रोलवर रु. 12.40 तर डिझेलवर रु. 9.80 एकूण केंद्र सरकारचा कर राहणार आहे. त्या व्यतिरीक्त राज्य सरकारचे कर वेगळे असणार आहेत.