Budget 2023-24: आजपासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरू; उद्योग क्षेत्रातील घटकांसोबत अर्थमंत्र्यांची आज बैठक
Budget 2023-24: केंद्र सरकारकडून आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून अर्थसंकल्पपूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
Budget 2023-24: आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प (Budget 2023-24) तयार करण्यासाठीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) या अर्थसंकल्पपूर्व बैठक घेणार आहे. आज निर्मला सीतारमण उद्योग जगत, पायाभूत सुविधांशी संबिधत उद्योग घटकांसोबत हवामान बदलाच्या तज्ज्ञांसोबतदेखील निर्मला सीतारमण चर्चा करणार आहेत.
अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बैठका ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामध्ये 2023-24च्या अर्थसंकल्पाशी निगडीत सूचना देण्यात येणार आहेत.
चार दिवस, सात बैठका
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्री चार दिवसात एकूण सात बैठका करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजाराच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. बुधवारी, 24 नोव्हेंबर रोजी त्या सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता यासह सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका घेणार आहेत. निर्मला सीतारामन 28 नोव्हेंबर रोजी कामगार संघटना आणि अर्थतज्ज्ञांच्या प्रतिनिधींसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक घेणार आहेत.
या बैठकांमध्ये काय अपेक्षित?
या बैठकांमध्ये उद्योजक, व्यावसायिक, कृषी तज्ज्ञ, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आदी विविध घटक आपल्या क्षेत्राच्या समस्या आणि मागण्यांबाबत अर्थमंत्र्यांकडे काही मागण्या करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, अर्थमंत्री या विविध घटकांच्या समस्या समजून आगामी अर्थसंकल्पात त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी या बैठका घेतल्या जातात. त्यातून सर्वसमावेशक अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न अर्थ मंत्र्यांकडून केला जातो.