आधी ताज हॉटेल, नंतर संसद भवन अन् आता अयोध्येतील राम मंदिर; देशातील ऐतिहासिक प्रोजेक्ट्समध्ये 'टाटा' अव्वल
Ayodhya Ram Mandir मध्ये 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिरात अभिषेक होणार आहे. टाटा समूहानं त्याच्या उभारणीत मोठी भूमिका बजावली आहे.
TATA Group : देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक आणि देशभरातील कोट्यवधी लोकांचा विश्वास गाठीशी असलेला उद्योग समूह म्हणजे, टाटा ग्रुप (TATA Group). टाटा आणि विश्वास असं एक अतूट नातं निर्माण झालं आहे. टाटांचं नाव तुम्हाला स्वयंपाकघरात (TATA Salt) वापरल्या जाणार्या मिठाच्या पॅकेटपासून ते आकाशात प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांपर्यंत दिसेल. आधुनिक भारताच्या उभारणीत मोठा वाटा उचलणाऱ्या टाटा उद्योग समूहाच्या कंपन्यांनी देशाचं नवीन संसद भवन (New Parliament Building) आणि अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामासाठी टाटा प्रोजेक्ट्सला पुरस्कारही मिळाला आहे.
देशाच्या विकासात टाटांचं मोलाचं योगदान
टाटा समूहाचे संस्थापक जमशेट जी टाटा यांना भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राचे जनक देखील म्हटलं जातं. देशातील पहिला एकात्मिक टाटा स्टील प्लांट (Tata Steel Plant) 1907 मध्ये सुरू करण्यात आला होता, तर इंडिया सिमेंट कंपनी (India Cement Company) 1912 मध्ये टाटा समुहानंच सुरू केली होती. इतकंच नाही तर याच समुहानं 1917 मध्ये भारतातील आपल्या प्रकारची पहिली औद्योगिक बँक, टाटा इंडस्ट्रियल बँक (Tata Industrial Bank) उघडली. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या देशाला टाटा समूहाकडूनच मिळाल्या आहेत.
विमा क्षेत्रापासून विमान वाहतूक क्षेत्रापर्यंत टाटांचा दबदबा
टाटांनी अनेक क्षेत्रांत आपले हातपाय रोवले आहेत. देशातील भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपनी, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी 1919 मध्ये टाटांनी सुरू केली. तसेच, पहिली विमान वाहतूक कंपनी टाटा एअरलाइन्स (आता Air India) 1932 मध्ये सुरू झाली. टाटा समुहानं 1983 मध्ये भारतात सर्वात आधी आयोडीनयुक्त मीठ पॅकेटमध्ये विकण्यास सुरुवात केली. समूहानं बांधकाम क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला आहे. याचंच उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर, मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल. टाटांच्या या यादीत आता देशाचं नवं संसद भवन आणि अयोध्येतील भव्य राम मंदिर या वास्तूंचाही समावेश झाला आहे.
राम मंदिराच्या उभारणीत टाटा कंपनीची महत्त्वाची भूमिका
अयोध्येत नव्यानं बांधलेल्या भव्य राम मंदिराबाबत बोलायचं झालं तर, याच्या उभारणीतही टाटा समुहानं मोलाची भूमिका बजावली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललाच्या अभिषेक सोहळ्याची तयारी सध्या अयोध्येत जोरात सुरू झाली आहे. टाटा समुहानंही राम मंदिराच्या उभारणीत आपली भूमिका बजावली आहे. मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी लार्सन अँड टुब्रो (L&T) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आणि टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीला L&T च्या कामाचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स (Tata Consulting Engineers) अयोध्येतील जवळजवळ पूर्ण झालेल्या रामजन्मभूमी तीर्थ मंदिरातील मंदिर प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करत आहेत.
टाटा प्रोजेक्ट्सनं नवं संसद भवन उभारलं
अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरापूर्वी टाटा समूहाची कंपनी टाटा प्रोजेक्ट्सनं (Tata Projects) भारताचं नवं संसद भवन बांधण्याचं कंत्राट जिंकलं होतं. टाटा प्रोजेक्ट्सनं निविदा प्रक्रियेत L&T च्या 865 कोटी रुपयांच्या बोलीच्या तुलनेत 861.90 कोटी रुपयांची बोली लावून संसदेच्या बांधकामाचं कंत्राट जिंकलं होतं. दरम्यान, ते पूर्ण होईपर्यंत, अहवालानुसार, हे बजेट सुमारे 1200 कोटी रुपयांपर्यंत वाढलं होतं आणि 19 सप्टेंबर 2023 पासून संसदेचं कामकाज सुरू झालं होतं.