Apple IPhone tariff: टॅरिफ वाचवण्यासाठी ॲपलने टाकला होता मोठा डाव, चेन्नईच्या फॅक्टरीत 24 तास शिफ्ट, 15 लाख आयफोन्स तयार केले अन् विमानाने धाडले
Apple send 600 tons of iPhones to U.S.: ॲपल कंपनीने 600 टन आयफोन्स अमेरिकेला पाठवले. 9 एप्रिलपूर्वी आयफोन्स अमेरिकेला पाठवण्याची धडपड, आयातशुल्क वाचवण्यासाठी धडपड

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर वेगवेगळे आयातशुल्क (Import Duty) लादले आहे. या देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर हे शुल्क आकारले जाईल. त्यामुळे इतर देशांमधील वस्तू अमेरिकेतली ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत कैकपटीने महागणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 26 टक्के इतके आयात शुल्क लादले आहे. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मनुष्यबळ स्वस्त असल्याने ॲपलच्या आयफोन्सचे (Iphones) मोठ्याप्रमाणावर उत्पादन होते. त्यामुळे अमेरिकेने टॅरिफ दर (Tariff Rates) जाहीर केल्यानंतर ॲपल कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता होती.
हे नुकसान टाळण्यासाठी ॲपलने 9 एप्रिलला आयात शुल्काची अंमलबजावणी होण्यापूर्वीच भारतातील फॅक्टरीतून जास्तीत जास्त आयफोन्स तयार करुन ते अमेरिकेला पाठवण्याचा प्लॅन आखला. अॅपलचा हा प्लॅन यशस्वी झाला असला तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता जगातील इतर देशांवर लादण्यात आलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली. मात्र, त्यापूर्वी ॲपलने भारतात केलेल्या आयफोनच्या रेकॉर्डब्रेक उत्पादनाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ॲपलने 9 एप्रिलपूर्वी भारतातून तब्बल 600 टन आयफोन्स अमेरिकेला पाठवले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क लादल्यानंतर ॲपल कंपनीने वेगाने हालचाली केल्या. 9 एप्रिलनंतर भारतात तयार झालेले आयफोन अमेरिकेत पाठवले असते तर त्यावर 26 टक्के शुल्क लागून ते महाग झाले असते. त्यासाठी चेन्नईतील फॉक्सकॉन कंपनीच्या प्लांटमध्ये 9 एप्रिलपूर्वी आठवड्याचे सातही दिवस काम सुरु ठेवण्यात आले होते. एकाही कर्मचाऱ्याला या काळात सुट्टी देण्यात आली नव्हती. या काळात दिवसातील 24 तास चेन्नईच्या प्लांटमध्ये आयफोनचे उत्पादन सुरु होते. तसेच हे फोन अमेरिकेला लगेच पाठवता यावेत यासाठी कस्टम क्लिअरन्सची प्रक्रियाही कशी जलद होईल, यासाठीही फॉक्सकॉनचे कर्मचारी विशेष प्रयत्न करत होते. एरवी फॉक्सकॉनच्या चेन्नईतील फॅक्टरीत तयार होणारे आयफोन्स कंटेनरमध्ये भरुन जहाजाने अमेरिकेला पाठवले जातात. भारतातून हे आयफोन अमेरिकेला पोहोचण्यासाठी साधारण 30 दिवस लागतात. मात्र, 9 एप्रिलपूर्वी हे आयफोन अमेरिकेला पोहोचावेत, यासाठी ॲपलने कधी नव्हे ते विमानांचा वापर केला. तब्बल 5 विमानं भरुन आयफोन अमेरिकेला गेल्याची माहिती आहे. या विमानांमधून तब्बल 600 टन म्हणजे साधारण 15 लाख आयफोन अमेरिकेला पाठवण्यात आले.
आणखी वाचा























