ट्रम्प यांच्या टॅरिफचा बॉम्ब अमेरिकेच्या मुळावर उठणार? Goldman Sachs चा धक्कादायक अहवाल, जगाची चिंता वाढली
Goldman Sachs ने अमेरिकेचा आर्थिक विकास दर 1.5 टक्क्यांवरून 1.3 टक्क्यांवर जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार अमेरिकेची अर्थव्यवस्था 0.3 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

Goldman Sachs Report On US Economy : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या आयात शुल्कामुळे जगभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेसह जगाला भोगावा लागणार असून जगाची वाटचाल मंदीकडे होण्याची शक्यताही अनेकांनी वर्तवली. असं असली तरी डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यातच आता Goldman Sachs च्या अहवालामुळे अमेरिकेसह जगाच्या चिंतेत भर टाकली आहे.
जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने अमेरिकेत मंदीची शक्यता 35 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा त्यांनी अमेरिकेच्या मंदीबाबत हा अंदाज व्यक्त केला. यामागे अमेरिका आणि इतर देशांमधले वाढते व्यापार युद्ध आणि ट्रम्प सरकारने लादलेले प्रचंड आयात शुल्क कारणीभूत आहे.
जगभरात मंदीची शक्यता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी टॅरिफ पॉलिसी जाहीर केली आणि इतर देशांवर मोठं आयात शुल्क लागू केलं. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही खळबळ उडाली आहे. शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक गुंतवणूक बँकांनी मंदीची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली. जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, अमेरिका आणि संपूर्ण जगात मंदीची शक्यता 60 टक्क्यांवर पोहोचली आहे.
अमेरिकेचा विकासदर घटणार
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई तर वाढू शकतेच, पण चीनसारखे देश सूडबुद्धीची कारवाई करू शकतात. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. Goldman Sachs ने 2025 साठी अमेरिकेचा आर्थिक विकास दर 1.5 टक्क्यांवरून 1.3 टक्क्यांवर आणला आहे. त्याचवेळी जेपी मॉर्गनचा अंदाज आणखी चिंताजनक आहे. त्यांचा असा विश्वास आहे की 2025 मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था 0.3 टक्क्यांनी संकुचित होऊ शकते.
व्यापार युद्धामुळे महागाई वाढणार
अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह (फेड) आता काय निर्णय घेणार यावर देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अवलंबून आहे. गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार, जूनपासून फेड त्याच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल आणि 25 बेस पॉइंट्सचे सलग तीन कपात होऊ शकतात. जेपी मॉर्गन आणि वेल्स फार्गो यांच्या मते, 2025 मध्ये व्याजदर तीन ते पाच वेळा कमी केले जाऊ शकतात जेणेकरून बाजाराला आधार मिळू शकेल.
एक प्रकारे व्यापारयुद्धाची धग आता अमेरिकन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचली आहे. अशीच स्थिती राहिल्यास संपूर्ण जगासाठी आर्थिक अडचणी वाढू शकतात. भारतासारख्या देशांना या परिस्थितीत स्मार्ट रणनीती बनवावी लागेल. त्यामुळे जागतिक मंदीचा प्रभाव कमी करता येईल आणि नवीन संधी शोधता येतील.























