मतदानावर डोळा ठेवून लाडक्या बहिण योजनेसाठी पैसा, मात्र घामाचा दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडं पैसा नाही, अजित नवलेंचा हल्लाबोल
मतदानावर डोळा ठेवून लाडक्या बहीण सारख्या योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे. मात्र, घामाचे दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसा नाही, ही अत्यंत संतापजनक बाब असल्याचे अजित नवले म्हणाले.
Ajit Nawale on Maharashtra Govt : दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना अद्यापही देण्यात आलेले नाही, ही अत्यंत संतापजनक गोष्ट असल्याचे मत व्यक्त करत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. मतदानावर डोळा ठेवून लाडक्या बहीण सारख्या योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे. मात्र, घामाचे दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसा नाही, ही अत्यंत संतापजनक बाब असल्याचे नवले म्हणाले.
प्रत्येक गोष्टीवर आंदोलन करावं लागणे हे दुर्दैवाने शेतकऱ्यांचे प्रारब्ध बनल्याचे अजित नवले म्हणाले. सरकारने पुन्हा एकदा मान्य केलेले अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये असेही अजित नवले म्हणाले.
दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा
मागील अनुभव पाहता अनुदानाची नाटके दोन-तीन महिने चालतात आणि पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. यावेळीही पुन्हा तसेच होईल अशी रास्त भीती शेतकरी व आंदोलकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे दीर्घकाळ उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याबद्दल जोवर धोरण घेतले जात नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला होता. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुदान वाटपातही अनेक गोंधळ अद्याप कायम आहेत. वर्षाच्या सुरुवातीला दोन महिने दिले गेलेल्या अनुदानात अनेक शेतकरी वंचित आहेतच, मात्र नंतर जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाबाबतही अनेक गंभीर शंका आहेत. 1 जुलै ते 10 जुलै या काळातील अनुदान अनेक संस्थांनी दिलेले नाही. अनेक खासगी संस्थांनी तर अद्याप दोन दसवडे पूर्ण होऊनही याबाबत 27 रुपयांचा दर देणे सुरू ठेवले आहे.
दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा
दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दुध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फुर्तपणे दुध उत्पादकांनी ठिकठीकाणी रास्तारोको, उपोषणे, निदर्शने सुरु केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला वारंवार करत आहे.
महत्वाच्या बातम्या: