Tata Nvidia Deal : रिलायन्सनंतर आता टाटाही मैदानात उतरणार! अमेरिकेतील सेमीकंडक्टर कंपनीसोबत कराराची शक्यता
Tata Group AI : रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टाटा समूहही अमेरिकन चिप कंपनी Nvidia सोबत भागीदारीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि सेमीकंडक्टरसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम हळूहळू भारतात होत आहे. गेल्या 24 तासात या संदर्भात दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टाटा समूहही अमेरिकन चिप कंपनी Nvidia सोबत भागीदारीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूह आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अमेरिकन चिप कंपनी एनव्हीडियासोबत भागीदारी करण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.
रिलायन्स समूहाने केली महत्त्वाची घोषणा
याआधी शुक्रवारी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणि Nvidia यांनी AI वर भागीदारी जाहीर केली होती. दोन्ही कंपन्या मिळून रिलायन्स इंडस्ट्रीजचे टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओच्या लाखो ग्राहकांसाठी एआय भाषा मॉडेल आणि जनरेटिव्ह अॅप्स विकसित करणार आहे. या भागीदारीअंतर्गत, Nvidia कॉम्प्युटिंग पॉवर प्रदान करेल. तर, रिलायन्स जिओ AI क्लाउड पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि देखभाल करेल आणि ग्राहकांशी संबंधित गोष्टींकडे लक्ष देईल.
Nvidia चा दबदबा
अमेरिकन कंपनी Nvidia संगणकीय प्रणालीच्या बाबतीत अग्रसेर आहे. OpenAI चे ChatGPT देखील Nvidia च्या संगणकीय प्रणालीद्वारे तयार करण्यात आली आहे. Nvidia ची सुरुवात गेमिंग आणि मल्टीमीडिया उद्योगासाठी 3D ग्राफिक्स बनवण्यासाठी करण्यात आली. आज कंपनीची कॉम्प्युटिंग सिस्टिममध्ये जवळपास मक्तेदारी आहे.
फॉक्सकॉनला मिळाला नवा भागिदार
तैवानचा फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप ST मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स NV (STMicroelectronics NV) सोबत एकत्र येत भारतात सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारण्यासाठी काम करत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, Foxconn आणि फ्रेंच-इटालियन STMicro यांनी मिळून भारतात 40 नॅनोमीटर चिप प्लांट उभारण्यासाठी एकत्र अर्ज करण्याची योजना आखली आहे. दोन्ही कंपन्या मिळून चिप बनवतील जी कार, कॅमेरा, प्रिंटर आणि इतर अनेक मशीनमध्ये वापरल्या जातील, अशी त्यांची योजना आहे.
भारत सरकारनं फॉक्सकॉनकडून STMicro सोबतच्या भागीदारीबद्दल अधिक माहिती मागितली आहे. फॉक्सकॉनची चिप बनवण्याचं तंत्रज्ञान असलेल्या इतर काही कंपन्यांशीही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, फॉक्सकॉन आणि एसटीमायक्रोनंही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.























