ऊर्जा क्षेत्रात अदानींचा दबदबा वाढला, 'या' कंपनीची 4100 कोटी रुपयांमध्ये खरेदी?
देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाचा (Adani Group) वीज क्षेत्रातील दबदबा वाढणार आहे. अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवरने एका नवीन कंपनीची खरेदी केली आहे.
Adani Group : देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाचा (Adani Group) वीज क्षेत्रातील दबदबा वाढणार आहे. अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवरसाठी नव्या कराराचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या लॅन्को अमरकंटक (Lanco Amarkantak Power) या वीज कंपनीसाठी ठराव प्रक्रियेत अदानी पॉवरला विजयी घोषित करण्यात आले आहे. या कंपनीची 4100 कोटी रुपयांन खरेदी केली आहे.
या कंपन्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जबाजारी कंपनी लॅन्को अमरकंटक पॉवरसाठी अदानी पॉवरला विजेते म्हणून निवडण्यात आले. अदानी पॉवरने लॅन्को अमरकंटक पॉवरसाठी 4,101 कोटी रुपयांची ऑफर सादर केली होती. अदानी पॉवरला लिलावात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखालील संघाकडून स्पर्धेला सामोरे जावे लागणे अपेक्षित होते, परंतु दोन्ही स्पर्धकांनी लिलावात भाग घेतला नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
खरेदीच्या शर्यतीत अनेक दिग्गज सहभागी
लॅन्को अमरकंटक पॉवर खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांना रस होता. दक्षिण भारतीय बाजारपेठेत कार्यरत असलेल्या Lanco अमरकंटकमध्ये सक्रिय ऊर्जा संयंत्रे आहेत, ज्यामुळे अनेक दिग्गज लिलाव प्रक्रियेत रस दाखवत होते. अदानीशिवाय वेदांताचे अनिल अग्रवाल, मुकेश अंबानी आणि नवीन जिंदाल यांनीही कंपनीत रस दाखवला होता.
अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची ऑफर नाकारली
लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेडसाठी कॉर्पोरेट दिवाळखोरी प्रक्रिया सप्टेंबर 2019 मध्ये सुरू झाली. 2022 मध्ये, अनिल अग्रवाल यांच्या कंपनी ट्विन स्टार टेक्नॉलॉजीजने 3000 कोटी रुपयांची बोली सादर केली होती, जी कर्जदारांनी खूप कमी असल्याचे सांगून नाकारली होती. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू झाल्यावर अदानी आणि अंबानी यांनी विक्री प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे कारण देत लिलावात भाग घेतला नाही. त्यानंतर केवळ पीएफसी कन्सोर्टियमने 3,020 कोटी रुपयांची बोली लावली होती.
दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेली औष्णिक वीज कंपनी लॅन्को अमरकंटक विकत घेण्यासाठी अदानी समूहानं यापूर्वी 3650 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अदानी समुहानं सहा महिन्यांत आपली दुसरी ऑफर सादर केली आहे. यावरून लॅन्को अमरकंटकच्या खरेदीत अदानी पॉवर किती स्वारस्य दाखवत आहे, याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, लॅन्को अमरकंटकवर मोठं कर्ज आहे, याच कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनी आपला स्टेक विकत आहे, अशी माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: