अदानी ग्रुप उभारणार देशातील सर्वात मोठा तांबे प्रकल्प, किती करणार गुंतवणूक?
Adani Group : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह (Adani Group) देशातील सर्वात मोठा तांबे प्रकल्प उभारणार आहे.
Adani Group : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह (Adani Group) देशातील सर्वात मोठा तांबे प्रकल्प उभारणार आहे. हा प्लांट गुजरातमधील (Gujarat) मुंद्रा येथे केला जाणार आहे. या प्लांटमुळं देशातील तांब्याची आयात कमी होईल. अदानी समूह कॉपर प्लांटवर सुमारे 1.2 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्याचा पहिला टप्पा मार्चअखेरीस सुरू होईल आणि आर्थिक वर्ष 2029 च्या अखेरीस प्रकल्पाची क्षमता सुमारे 10 लाख टन असणार आहे.
भारतात हरित ऊर्जेची मागणीत वाढ
अदानी समूह गुजरातमध्ये सुमारे 1.2 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुक करणार आहे. यामुळं हरित ऊर्जा पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. यामुळं भारताची तांब्याची आयातही कमी होणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारताने चीनसारख्या इतर देशांच्या बरोबरीने तांब्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलावरील अवलंबित्व संपवण्यासाठी भारत हरित ऊर्जेच्या इतर माध्यमांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहने (EV), चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बॅटरीच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. या सर्वांसाठी तांब्याची गरज असते.
पहिल्या टप्प्यात किती होणार उत्पादन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी एंटरप्रायझेस (AEL) ची उपकंपनी असलेल्या कच्छ कॉपर लिमिटेड (KCL) हा ग्रीनफिल्ड कॉपर प्रकल्प तयार करत आहे. दोन टप्प्यांत बांधण्यात येणारा हा प्रकल्प वर्षाला 10 लाख टन तांब्याचे उत्पादन करु शकेल. पहिल्या टप्प्यात त्याची क्षमता वार्षिक 5 लाख टन असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, अदानी तांबे व्यवसायाला गांभीर्याने घेत आहेत. कारण, त्यांना या क्षेत्रातील प्रमुख बनायचे आहे. 2030 पर्यंत ते जगातील सर्वात मोठे तांबे स्मेल्टिंग कॉम्प्लेक्स तयार करणार आहेत.
भारतात दरडोई तांब्याचा वापर 0.6 किलो
भारतात दरडोई तांब्याचा वापर 0.6 किलो आहे तर जागतिक सरासरी 3.2 किलो आहे. स्वच्छ ऊर्जेकडे भारताचे लक्ष वाढत असल्याने हा वापर 2030 पर्यंत दुप्पट होऊ शकतो. स्टील आणि ॲल्युमिनियमनंतर तांबे हा तिसरा सर्वात जास्त वापरला जाणारा धातू आहे. अदानी समूह स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. भारतातील तांबे उत्पादन सध्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे आहे. गेल्या 5 वर्षांत तांब्याच्या आयातीत प्रचंड वाढ दिसून आली आहे.
महत्वाच्या बातम्या: