(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tomato price : देशाच्या राजधानीत टोमॅटोनं केलं 'शतक', मुसळधार पावसाचा दरावर परिणाम, आणखी दर वाढण्याची शक्यता
टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक बातमी समोर आली आहे. टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे आता टोमॅट आहेत, त्यांना होणार आहे.
Tomato price : टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) दिलासादायक बातमी समोर आली आहे. टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे आता टोमॅट आहेत, त्यांना होणार आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळं त्याचा पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळं किरकोळ विक्रीच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) टोमॅटोचे दर हे 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. येत्या काही दिवसात टोमॅटोचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळ टोमॅटो पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक भागात पावसामुळं पिकांचं देखील नुकसान झालं आहे. दरम्यान, वाढत्या दरात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, ग्राहकांना फटका बसत आहे. दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किंमती 100 रुपये किलोच्या पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच प्रतिकूल हवामानामुळे बाजारात टोमॅटोची विक्री झाली आहे.
100-120 रुपये प्रति किलोपर्यंत भाव
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 रुपये किलोवर पोहोचले. तर असंघटित किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.
मात्र, सरकारी आकडेवारीनुसार टोमॅटोचे दर अद्याप 100 रुपयांपर्यंत पोहोचलेले नाहीत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 20 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोच्या दैनिक सरासरी किरकोळ किमती 93 रुपये प्रति किलो होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, 20 जुलै रोजी टोमॅटोची राष्ट्रीय सरासरी किंमत 73.76 रुपये प्रति किलो होती.
का होतेय टोमॅटोच्या दरात वाढ?
टोमॅटोचे भाव वाढण्यास प्रतिकूल हवामान जबाबदार धरले जात आहे. उष्णतेच्या लाटेनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढत आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातून किरकोळ बाजारात टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटो व्यतिरिक्त दिल्लीत बटाटे आणि कांद्याच्या किमतीही वाढत आहेत.
दरवर्षी या महिन्यांत टोमॅटोच्या दरात वाढ होत असते. गतवर्षी परिस्थिती खूपच बिकट झाली होती, किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 350 रुपये किलोवर पोहोचला होता. त्यानंतर सरकारने सहकारी संस्थांच्या मदतीने अनेक शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली. दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांना मदर डेअरीच्या सफाल स्टोअरमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटो मिळत होते.
दिल्लीत बटाटा आणि कांद्याच्या दरातही तेजी
दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांदा आणि बटाट्याच्या सध्याच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. दिल्लीत कांद्याचे दर हे 46.90 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. बटाटा 41.90 रुपये किलो दराने विकला जात आहे.