BSNL 5G Service: बीएसनएनएल लाँच करणार 5 जी सेवा, पण कधी? टेलिकॉम मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
BSNL 5G Service: बीएसएनएलकडून देशभरात 5 जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
BSNL 5G Service: भारतात काही शहरांमध्ये 5-जी इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने (Airtel) 5 जी इंटरनेट सेवा सुरू केली असून पुढील वर्षाच्या अखेरीस देशभरात 5 जी इंटरनेट (5G Internet) लाँच करण्याची तयारी या खासगी कंपन्यांनी केली आहे. तर, दुसरीकडे सरकारी बीएसएनएल (BSNL) कंपनी कधी 5 जी इंटरनेट लाँच करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना आता दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या 5 जी बाबत (BSNL 5G) माहिती देताना सांगितले की, बीएसएनएलदेखील लवकरच 5 जी इंटरनेट लाँच करणार आहे. बीएसएनएलचा अपग्रेड करण्यासाठी किमान 5 ते 7 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी ही 5 जी इंटरनेट सेवा संपूर्ण देशात लाखो टेलिकॉम टॉवरसह सुरू करण्यात येणार आहे. बीएसएनएलच्या 4 जी तंत्रज्ञानाला 5 जीमध्ये अपग्रेड करून येत्या 5 ते 7 महिन्यात 1.35 लाख टॉवरवर रोलआउट करण्यात येणार असल्याचे वैष्णव यांनी म्हटले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
CII च्या एका कार्यक्रमात, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी वाढ करण्यात येणार आहे. हा निधी 500 कोटींहून 4000 कोटी प्रति वर्ष इतका करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या स्टार्टअपला प्रोत्साहन मिळणार आहे.
BSNL ने Tata Consultancy Services (TCS) ला 5G चाचणीसाठी उपकरणांबाबत चर्चा केली आहे. 5G सेवा भारतातील दुर्गम भागात BSNL कडून दिली जाणार आहे. यामुळे लोकांच्या नेटवर्कशी संबंधित समस्या दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे खात्यातंर्गत 800 स्टार्टअप आणि संरक्षण खात्यातंर्गत 200 स्टार्टअप कार्यक्रम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
रिलायन्स जिओ आणि एअरटेलची तयारी
दरम्यान, 5 जी इंटरनेटमुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होणार आहे. नोकिया आणि एरिकसन भारतात जिओला स्टॅण्डअलोन नेटवर्क स्थापन करण्यास मदत करणार आहे. त्याशिवाय, हायस्पीड 5 जी नेटवर्क देणार आहे. एअरटेल नॉन स्टॅण्डअलोन नेटवर्कवर काम करते. त्याशिवाय, जिओजवळ अधिक भागांमध्ये नेटवर्क देणारे 700MHz नेटवर्क आहे. त्यामुळे जिओ देणार असलेले 5 जी इंटरनेट अधिक वेगवान असणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर एअरटेलनेदेखील ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी रणनीती आखली आहे. देशातील ग्राहकांना सर्वोत्तम 5G सेवा पुरवण्यासाठी एअरटेल 5G प्लसने एक विशिष्ट तंत्र वापरले आहे. यामध्ये सर्वात अधिक विकसित इकोसिस्टम आणि टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला असल्याचा दावा एअरटेलने केला आहे.