अफलातून... 230 किमी एव्हरेज, परवडणारी किंमत, 2 किलोची टाकी; अशी आहे जगातील पहिली CNG दुचाकी
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी आहे.
पुणे : जगातील पहिली सीएनजी बाईक आज पुण्यातून लाँच झाली. ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत हमारा बजाज... म्हणणाऱ्या बजाज कंपनीने (Bajaj) या बाईकची निर्मित्ती केली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते (Nitin Gadkari) आज या बाईकच्या लाँचिंगचा सोहळा पार पडला. ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्या क्रांतीची बीज रोवणारा हा लाँचिंग सोहळा चर्चेत ठरला तो बजाज कंपनीने केलेल्या दाव्यामुळे. कारण, सीएनजीवर (CNG) धावणारी ही जगातील पहिली दुचाकी असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. आता, कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षाही राजीव बजाज यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. 125 सीसीचं इंजिन असणारी ही बाईक 2 किलो सीएनजी टाकीची क्षमता ठेवते.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळते. त्यातच, आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी, भारत हा वाहनउद्योग क्षेत्रात अगोदर सातव्या क्रमांकाचा देश होता, आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. तसेच, या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
किती आहे किंमत
बजाजने लाँच केलेल्या या सीएनजी बाईकची लवकरच विक्री सुरू करण्यात येणार असून सध्या लाँच झालेल्या तीन बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या तिन्ही बाईकची किंमत अनुक्रमे 95 हजार, 1 लाख 5 हजार आणि 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे.
सीएनजी बाईक 'अशी' आहे!
- 125 सीसी
- 2 किलोची सीएनजी टाकी
- सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे.
- सीएनजी टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट घेण्यात आलं आहे.
- 2 लिटर पेट्रोल टँकही आहे
- 230 किमी एव्हरेज (सीएनजी आणि पेट्रोल मिळून)
बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी - गडकरी
सीएनजी बाईकची किंमत एक लाखापेक्षा कमी असावी, अशी बजाजकडून अपेक्षा आहे. त्यामुळं ही बाईक चांगली प्रचलित होईल. एकदा टाकी फुल केली की ही बाईक 230 किलोमीटरचं एव्हरेज देईल, असा दावा केला जात असून ही महत्वाची बाब आहे. पण, या बाईकमध्ये सीएनजीची टाकी कुठं आहे. हे शोधून काढायचं म्हणजे एक संशोधनाचा भागच आहे. बजाज कंपनीने ज्या पद्धतीने या बाईकची निर्मिती केलीये, यासाठी त्या प्रत्येकाचे नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले. बाईक निर्मित्ती प्रक्रियेत असलेल्या प्रत्येकाचे टीमवर्क म्हणून गडकरींकडून अभिनंदन करण्यात आले.